|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्याच्या किशोरकडून दुसऱयांदा एव्हरेस्ट सर

पुण्याच्या किशोरकडून दुसऱयांदा एव्हरेस्ट सर 

प्रतिनिधी/ पुणे

पुण्याचे रहिवासी किशोर धनकुडे यांनी दुसऱयांदा जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. 2014 मध्ये त्यांनी उत्तर म्हणजेच चीनच्या दिशेने एव्हरेस्ट सर केले होते. आता त्यांनी दक्षिण म्हणजेच नेपाळच्या दिशेने देखील एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकविला आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिलेच वीर ठरले आहेत.

किशोर यांनी 15 मे ला एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून चढाई करण्यास सुरूवात केली. कुम्बू ग्लेशिअर, आईसफॉल यांसारखे अडथळे पार करत त्यांनी डेथझोन गाठला. या डेथझोनवर ऑक्सिजन अत्यल्प असतो तर वारे प्रचंड वाहत असतात. डेथझोनवरील वारे साधारणतः 200 ते 250 किलोमीटर प्रतितास एवढय़ा वेगात वाहत असतात. अशा वातावरणात निभावून पुढे जाणे कठीण काम असते. पण ही जोखीम देखील किशोर यांनी पार करत शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एव्हरेस्ट सर केले.

2014 ला पहिल्यांदा एव्हरेस्ट उत्तर दिशेने सर केले. लगेच दुसऱयाच वर्षी दक्षिण दिशेने एव्हरेस्टवर चढाई करण्याचा किशोर यांचा विचार होता. पण 2015 ला या भागात भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीने नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढाईवर बंदी केली. त्यामुळे किशोर यांची इच्छा दाबून ठेवावी लागली. पण यंदाच्या वर्षी या इच्छेला त्यांनी मूर्त रूप दिल्याने धनकुडे परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

त्यांना महाविद्यालयात असल्यापासून ट्रेकिंगची आवड होती. शिक्षणानंतर व्यवसायामुळे ते आपल्या आवडीकडे लक्ष देऊ शकत नव्हते. पण आवड आणि जिद्द त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी व्यवसाय थांबवून आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी दक्षिण अफ्रिकेत कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये त्यांना ब्राँझ पदक मिळाले. यंदाच्या 7 जूनला होणाऱया मॅरेथॉन स्पर्धेतही ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता न थांबता ते मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यांनी आपला 42 वा वाढदिवस 42 वेळा सिंहगड चढून साजरा केल्याचे त्यांच्या पत्नी नूतन धनकुडे यांनी सांगितले.

अरुणाचलच्या आन्शुकडून विक्रमाची नोंद

16 मे ते 21 मे या पाच दिवसांच्या कालावधीत दोनदा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम अरूणाचल प्रदेशच्या आन्शू जामसेनपा या महिलेने केला आहे. तिने 16 मे या दिवशी सकाळी 9 वाजता एव्हरेस्टवर भारताचा ध्वज फडकाविला. त्यानंतर लगेच रविवारी 21 मे या दिवशी तिने पुन्हा सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. अशा प्रकारे एका आठवडय़ात दोनदा एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती एकमेव महिला ठरली.

 2011 मध्येही तिने दोनदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र त्यावेळी हा पराक्रम तिने 10 दिवसांच्या अंतराने केला होता.

Related posts: