|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चार नावांची शिफारस

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चार नावांची शिफारस 

प्रतिनिधी / मडगाव

8 जून रोजी गोव्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान होणार असून या जागेसाठी काँग्रेस पक्षाने चार नावाची शिफारस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे. या चार जणांमध्ये काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस गिरीष चोडणकर, युवा नेते संकल्प आमोणकर, माजी खासदार रमाकांत आंगले व उर्फान मुल्ला यांचा समावेश आहे.

गिरीष चोडणकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात पदयात्रा काढून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण केले होते. त्याचा काँग्रेस पक्षाला बऱयापैकी लाभ झाला होता. पक्षाचे एकूण 17 आमदार निवडून आले होते. पण, नंतर सरकार स्थापन करण्यात मात्र अपयश आले. गिरीष चोडणकर हेच सद्या विविध विषयांवर आवाज उठवून काँग्रेसची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ते भंडारी समाजातील नेते असल्याने, त्यांच्या नावाची राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षातर्फे शिफारस करण्यात आली आहे.

मुरगांव मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविलेले व अवघ्याच मतांनी पराभूत झालेले युवा नेते संकल्प आमोणकर यांच्या नावाची देखील काँग्रेस पक्षाने शिफारस केली आहे. अल्पसंख्यक विभागातून उर्फान मुल्ला यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. उर्फान मुल्ला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षासाठी भरीव असे कार्य केल्याने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रानी दिली.

दक्षिण गोव्याचे माजी खासदार रमाकांत आंगले यांच्या नावाची देखील काँग्रेस पक्षाने शिफारस केली आहे. रमाकांत आंगले हे सद्या मडगाव अर्बंन बँकेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. या चार नावांपैकी पक्ष श्रेष्ठी एका नावावर शिक्कामोतर्ब करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. मावळते खासदार शांताराम नाईक हे दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेल्याने, पक्षाने यावेळी त्यांच्या नावाची शिफारस केलेली नाही. यावेळी नवा चेहरा पक्षातर्फे पुढे आणला जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

Related posts: