|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लाच घेताना आणखी दोघे रंगेहाथ

लाच घेताना आणखी दोघे रंगेहाथ 

देवगड : वेंगुर्ल्यात महसूलचा कर्मचारी लाच घेताना पकडला जाण्याची घटना ताजी असतानाच रोजगार हमी योजनेंतर्गत मुणगे कारिवणेवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱयाचे काम मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लघू पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता संतोष गणपत भाबल (51) व त्याचा खासगी सहाय्यक अविनाश लक्ष्मण उपरकर (48) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. या दोघांनाही अटक करण्यात आली असून देवगड पं. स. मधील सहाय्यक लिपीक सौ. स्वप्नजा संतोष बिर्जे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांनी दिली.

देवगड तालुक्यातील मुणगे कारिवणेवाडी येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत देवगड पंचायत समितीकडे पाठविण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव गेली अनेक महिने मंजूर केला जात नव्हता. मुणगे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जोशी यांनी या बंधाऱयाच्या कामासाठी पाठपुराव सुरू केला. यावेळी पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता (वर्ग 2) संतोष भाबल यांनी बंधाऱयाचे काम मंजूर करण्यासाठी व कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी गटविकास अधिकाऱयांना 10 हजार रुपये व सहाय्यक लिपिक सौ. बिर्जे व इतरांना देण्यासाठी पाच हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी जोशी यांच्याकडे केली.

भाबल यांनी हे पैसे त्यांचे सहाय्यक अविनाश उपरकर यांच्याकडे देण्यास सांगितले. याबाबत तक्रारदार प्रसाद जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 15 मे 2017 रोजी या बाबत पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये सौ. बिर्जे या संशयास्पद आढळल्या. तर पडताळणीमध्ये गटविकास अधिकाऱयांबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यानुसार लाचप्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून पंचायत समितीच्या कार्यालयातच खासगी सहाय्यकाकरवी लाच घेताना शाखा अभियंता भाबल यांना रंगेहाथ पकडले.

कारवाई करणाऱया पथकामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हा पोलीस उपअधीक्षक चिंदरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलीस नाईक नीलेश परब, पोलीस नाईक कांचन प्रभू, पोलीस शिपाई महेश जळवी, जितेंद्र पेडणेकर यांचा समावेश आहे.

Related posts: