|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू 

कुडाळ : विविध प्रलंबित मागण्यांची शासनस्तरावर दखल न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगारांनी अखेर वीज वितरणच्या येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ‘हम सब एक है’, ‘कामगार एकजुटीचा विजय असो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा’ अशा घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हय़ातील 270 कंत्राटी कामगार या आंदोलनात उतरले आहेत.

गेली बरीच वर्षे वीज कंत्राटी कामगारांच्या महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. निदर्शने, उपोषण व अन्य लोकशाही मार्गाने शासनाचे दरवाजे ठोठावूनही त्यांना न्याय मिळाला नाही. या कामगारांच्या राज्य संघटनेने 8 मे रोजी मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर निदर्शने केली होती. मागण्यांबाबत तात्काळ दखल न घेतल्यास आजपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला होता.

जिल्हय़ातील सर्व 270 कंत्राटी कामगार येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एकवटले आणि काम बंद आंदोलन सुरू केले. नोव्हेंबर-डिसेंबर 2016 ची थकीत बिले तसेच जानेवारी ते एप्रिल 2017 पर्यंतची विभागीय स्तरावरील थकीत बिले 15 मेपर्यंत देण्याची व्यवस्था करावी. या कामाची निविदा 31 मे रोजी संपत असून पुढील निविदेची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी. समान काम समान वेतन धोरण लागू करा. कायम करेपर्यंत रोजंदारी कामगार पद्धती सुरू करा. रोजगाराची हमी द्या-ज्येष्ठता यादी जाहीर करा आदी प्रमुख मागण्या आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील राज्यातील 32 हजार कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांना सेवा देत आहेत. मात्र, त्यांच्या कामाची कदर शासनस्तरावर घेतली जात नाही. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार पेटून उठला आहे. आम्हाला योग्य न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही. राज्य संघटनेच्या आदेशानुसार हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांनी सांगितले.

वीज वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप नेरुरकर यांच्यासह विविध वीज संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. अजय गावडेंसह विठ्ठल राणे, नंदकुमार पवार, हनुमंत पास्ते, विवेक परब, शामराव शिर्के, प्रदीप मोडक व अन्य कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.