|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पाडळी-पारगाव रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन

पाडळी-पारगाव रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन 

नवे पारगाव / प्रतिनिधी

     हातकणंगले तालुक्यातील पाडळी-मानेवाडी ते पारगाव, अंबप ते अंबपवाडी ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, परीसरातील प्रवाशांसह, वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित विभागाकडे वेळोवेळी याबाबत तक्रारी करुनही कानाडोळा करत संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने स्थानिकांतून प्रचंड नाराजी पसरल्याने पावसाळ्यापूर्वी लवकर हा रस्ता दुरुस्तीसह नूतनीकरण होऊन न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा हातकणंगलेचे माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव सीद (पारगाव) यानी दिला आहे.

 अंबप ते अंबपवाडी, पारगाव ते पाडळी व मानेवाडी हा रस्ता येथील जवळच्या वारणा समूहातील विविध संस्थांतून नोकरी करणारे, कोडोली व पेठ वडगाव बाजारपेठेकडे जाणारे व्यापारी, शेतकरी व जवळच्या विविध शैक्षणिक शाखा संकुलांतुन शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी व प्रवासी नागरीकांसह सर्व वाहनधारकाना हे सर्वात जवळचे सोयीचे मार्ग आहेत.या रस्त्यावरुन राञंदिवस सतत वाहतुकीची वर्दळ चालु असते.याशिवाय पारगांव व मनपाडळे गावातुन श्री समर्थ रामदासस्वामी स्थापित 11 मारुती मंदिरे असल्याने येथील मारुती दर्शनासाठी राज्यातुन विविध ठिकाणहुन व छोटय़ा – मोठय़ा वाहनातुन येणार्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना प्रवाशाना कमरेच्या व्याधींचा सामना करावा लागतो आहे,याशिवाय प्रवासातील छोटय़ा मोठय़ा वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. पुर्वि हे रस्ते पक्के व डांबरीकरण केले होते,पण सध्या या रस्त्यावर नावालाही डांबर राहिलेले नाही.रस्त्यावर मोठमोठाले खडडे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते कळायला मार्ग नाही.त्यामुळे वाहनचालकाना प्रवास करताना जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

 या रस्त्यांच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी येथील नागरीकानी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत,माञ संबंधित विभागांकडुन प्रत्येक वेळी या गंभीर विषयांकडे कानाडोळा केला आहे.त्यामुळे संबंधित विभागाकडुन तातडीने लक्ष घालुन या रस्त्यांचे दुरुस्तीसह नवीन डांबरीकरण करावे,अन्यथा तिव्र आंदोलन करणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव सीद,बाबासाहेब भोसले,विश्वास पाटील,अनिल चौगुले (देशमुख), नवे पारगांवचे माजी सरपंच संभाजी चरणे,धोंडीराम लोखंडे,नितीन हुजरे,स्वाभिमानीचे संघटक वैभव कांबळे,विभागप्रमुख संपतराव पोवार,शिवाजीराव आंबेकर,मनोहर डोईजड,वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे,मनपाडळेच्या सरपंच सुशिला वाघमारे,उपसरपंच रायबाराजे शिंदे,संतोष पाटील, सर्जेराव शिंदे,दिलीप सुर्यवंशी,विश्वास शिंदे,भरत सुर्यवंशी, पाडळीचे माजी सरपंच प्रकाश पाटील,रंगराव पाटील,प्रकाश जाधव, सखाराम माने,मधुकर दाभाडे,देवदास जाधव,उत्तम जाधव आदीनी दिला आहे.