|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना

फोंडा शहरासाठी गॅसवाहिनी योजना 

खासदार सावईकर यांच्याहस्ते कामाला प्रारंभ

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा पालिका क्षेत्रात घरगुती सरोईच्या गॅस पुरवठय़ासाठी यापुढे सिलिंडर ऐवजी थेट गॅस वाहिनीद्वारे पुरवठा करण्यात येणार असून या महत्त्वपूर्ण योजनेच्या कामाला नुकताच शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम खात्यामार्फत गोवा राज्यात प्रथम फोंडा शहरातून ही योजना हाती घेण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांच्याहस्ते काल सोमवारी सकाळी तिस्क-फोंडा येथे गॅस जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.

गोवा नॅच्युरल गॅस प्रा. लि. या आस्थापनाच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. गोव्यासाठी साधारण रु. 120 कोटींचा हा भू गॅसवाहिनीचा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात पणजी आणि फोंडा शहरात हे काम होणार असल्याची माहिती खासदार सावईकर यांनी यावेळी बोलताना दिली. फोंडा आणि तिसवाडी तालुक्यांसह पेडणे, बार्देश, डिचोली, आणि सत्तरी या भागात येणाऱया काळात ही योजना हाती घेण्यात येणार आहे. फोंडा शहरातील गॅसवाहिनीचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्याची माहिती आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकुमार सचदेवा यांनी दिली. गॅसवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांना गॅस सिलिंडरची आवश्यकता भासणार नाही. नळ व वीज जोडणीच्या तत्त्वावर मिटरद्वारे मासिक भाडे भरावे लागणार आहे. केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा प्रकल्प असून देशभरातील पन्नास शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित होत असल्याची माहिती सचदेवा यांनी दिली. गॅसवाहिनी योजना ही सुरक्षित व आर्थिकदृष्टय़ा सुलभ अशी असून घरगुती रसोयीच्या गॅस पुरवठय़ाबरोबरच, व्यावसायिक आणि आद्योगिक क्षेत्रात या योजनेचा लाभ होणार आहे.

खासदार सावईकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक सुनिल देसाई, विश्वनाथ दळवी, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, शिवानंद सावंत, आस्थापनाचे अधिकारी उद्देश सांगोडकर आदी उपस्थित होते. 

Related posts: