|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीचा काजू मौसम अंतिम टप्प्यात

सत्तरीचा काजू मौसम अंतिम टप्प्यात 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीचा काजू मौसम सध्यातरी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. चार महिन्यापूर्वी हा मौसम सुरू झाला होता खरा मात्र गेल्या दहा वर्षात जेवढे मुबलक पीक मिळाले नाही हे पीक उपलब्ध झाल्याने काजू बागायतदार आनंदी झाला आहे. बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचे पीक हे सर्वसाधारण पिकाच्या तुलनेत दीडपट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डोंगराळप्रमाणे सपाट जागेत असलेल्या कलमांची लागवडसुद्धा उत्पादनासाठी चांगले उतरल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र सत्तरीतील व गोवा राज्यातील इतर भागात महामार्गावरील अनेक मद्यालये बंद करण्यात आल्याचा फटका दारूनिर्मिती व्यवसायामुळे झाला आहे. येणाऱया काळात याचे स्पष्ट परिणाम व्यावसायिकांना दिसणार आहेत.

यंदा भागाचे पीक घेण्यासाठी लागणारे कष्ट व कामासाठी कामगारांची कमतरता यावर विचार करून भातपिकांच जागी काजू लागवडीवर मोठय़ा प्रमाणात भर दिलेला आहे. यामुळे सत्तरीतील काजू क्षेत्राच्या लागवडीत मोठी भर पडलेली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून काजू उत्पादनातही वर्षानुवर्षे वाढ होत आहे. यंदा मात्र काजू पिकांसाठी सुपीक वातावरण व सुरूवातीच्या काळात पावसाचे प्रमाण याचा चांगला फायदा पिकावर झाला आहे. महत्वाचे म्हणजे डोंगराळ भागातील काजूप्रमाणे कलमांच्या काजू लागवडीवर याचा उत्तम परिणाम झाला आहे. पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला. यामुळे पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले. मुबलक स्वरूपाचे उत्पादक मिळण्यास मदत झाली आहे. यंदाच्या उत्पादनाचा अनुकूल परिणाम बाजारपेठेवर होणार आहे. कारण सत्तरीची पूर्ण वर्षाची बाजारपेठ काजू मौसमावर उपलब्ध आहे.

यंदाचा मौसम जवळपास दीडपटीने वाढला आहे. सत्तरीच्या ठाणे, म्हावूस, नगरगाव, सावर्डे आदी ग्रामक्षेत्रात भागातील काजू उत्पादनाने बागायतदारांच्या तिजोरीत चांगली भर घातलेली आहे. सुरूवातीच्या काळात काही प्रमाणात उत्पादनात मंदी होती मात्र तद्नंतर उत्पादनाचा आलेख चढला. यंदा काजूचा दर चांगला लागल्याने याचाही बराच फायदा बागायतदारांना झाला आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात दरेचा चढ-उतार यामुळे बागायतदारांत नाराजी निर्माण झाली होती. काजू विकत घेण्यासाठी कारखानदारांकडून कोटय़ावधीची उलाढाल झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरवर्षीपेक्षा दीडपटींच्या जास्त प्रमाणात निधीची उलाढाल करावी लागली आहे. यामुळे अनेकवेळा रोख पैशाची देवाणघेवाण करताना संबंधितांना समस्या निर्माण झाली होती मात्र त्याचा मोठासा परिणाम झालेला नाही. सध्या सत्तरीतील अनेक कारखाना, कोठारे काजू उत्पादनाने फुल्ल झाली आहेत. मात्र गोव्यातील पर्यटकांना याचा फायदा होण्याची खरी गरज आहे असे बागायतदारांचे म्हणणे आहे.

न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करताना गोवा सरकारने महामार्गावर 220 मीटर अंतरावर येणारी मद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सत्तरीतील 88 मद्यालयांवर याचा परिणाम झाला आहे. याच सरळ फटका यंदाच्या दारूनिर्मिती प्रक्रियेवर झाला आहे. सध्या दारूनिर्मिती करणाऱया व्यावसायिकांची कोठारे भरलेली आहेत व यास दरवर्षीप्रमाणे मागणी नाही यामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे काही भागात दारू निर्मिती करणाऱया भट्ठय़ा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेत दारूला बसलेल्या फटक्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला आहे. सत्तरीत दारूनिर्मिती करणाऱया भट्ठय़ांची संख्या जवळपास 500 पेक्षा जास्त आहे. यातून प्रतिवर्षी लाखो लिटर दारूची निर्मिती होते. याची विक्री गोव्याच्या विविध भागातील बाजारपेठेवर होते. यंदा मात्र महामार्गावरील निर्णयाचा फटका व्यवसायाला बसलेला आहे. सध्या बंद असलेली मद्यालये काही काळानंतर पुन्हा सुरू न झाल्यास याचा मोठा फटका व्यवसायावर होणार आहे.

Related posts: