|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » चिपी विमानतळ प्रकल्पाची खासदार राऊतांकडून पाहणी

चिपी विमानतळ प्रकल्पाची खासदार राऊतांकडून पाहणी 

परूळे : चिपी विमानतळ प्रकल्प कामाची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी दुपारी केली. युद्धपातळीवर काम सुरू असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. डिसेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करून 30 जून 2018 ला जिल्हावासियांचे हवाई प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल, यासाठी आयआरबीसह महाराष्ट्र शासन व भारत सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत.

विमानतळाची धावपट्टी मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून सर्व इमारती नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील. या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार असून अन्य परवानगींसाठी तीन-चार महिने आवश्यक असल्याने 30 जून 2018 पूर्वी सिंधुदुर्गवासियांबरोबरच पर्यटकांना हवाई प्रवासाचा मार्ग खुला होईल, अशी माहिती आयआरबीचे जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे यांनी खासदार राऊत यांना दिली.

चिपी विमानतळ पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करीत आहेत. गोवा राज्यातील मोपा विमानतळाचा फरक सिंधुदुर्गातील विमानतळाला पडणार नाही. स्थानिक प्रवाशांबरोबर पर्यटक मोठय़ा संख्येने या विमानतळाचा लाभ घेतील, असे राऊत म्हणाले.

रस्त्यांचे प्रस्ताव ‘साबां’कडे

जि. प. सदस्य संजय पडते, सुनील म्हापणकर, अमरसेन सावंत व नागेंद्र परब, सचिन देसाई, अभय शिरसाट, राजन नाईक, राजेश लोणकर, एल अँड टीचे  पाटील, एमआयडीसीचे लालवानी, म्हात्रे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळाकडून कुडाळ, वेंगुर्ले, मालवण हे तालुके जोडण्यासाठी रस्त्यांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तारीख पे तारीख

विमानतळ कामादरम्यान 25 सप्टेंबर 2013 रोजी बंद झालेला सागरी मार्ग काढण्यात शासनाला गेल्या तीन वर्षांत अपयश आल्यानंतर नेतेमंडळी हा मार्ग वाहतुकीस योग्य करण्याचे आश्वासन देतात. मात्र, रस्ता काही होईना आणि खड्डेमय प्रवास काही सुटेना, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. सिंधुदुर्गवासियांचे हवाई प्रवासाचे स्वप्न कधी पूर्ण होणार हे प्रश्नचिन्ह आहे. कारण जून 2016 मध्ये विमानप्रवास सुरू होईल, असे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर 2017 पर्यंत  विमानतळ सुरू होईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सर्वच नेतेमंडळी व आयआरबीने जाहीर केले होते. मात्र, आज खासदार राऊत यांच्यासमोर विमानतळ प्रकल्पाची माहिती देताना आयआरबीने हा विमानतळ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल व प्रत्यक्षात हवाई प्रवासासाठी 30 जून 2018 मध्ये खुला होईल, असे सांगितल्याने आता आणखी एक वर्ष सिंधुदुर्गवासियांना हवाई प्रवासाची वाट पाहावी लागणार आहे. गेली दोन वर्षे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कठीण

सुनील म्हापणकर व सचिन देसाई यांनी विमानतळाच्या चार किमी वळण रस्त्याबाबत राऊत यांचे लक्ष वेधले. खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे कठीण बनले असून एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे सर्वसामान्यांना खड्डय़ांतून प्रवास करावा लागत आहे, याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

Related posts: