|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोणती घोषणा द्यावी हे शिकवू नये

कोणती घोषणा द्यावी हे शिकवू नये 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. मात्र हा राग मनात धरून कर्नाटक सरकारने सीमाभागातील जनतेची मुस्कटदाबी करू नये. देश एक आहे. या देशात कोणी कोणती घोषणा द्यावी यावर बंधन घालण्याचा कोणत्या राज्याला अधिकार नाही. वेळ पडली तर कर्नाटक सरकारच्या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू असा सज्जड इशारा कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा सीमाप्रश्न समितीचे समन्वयक चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिला.

प्रसंगी न्यायालयात जाणार

 चंद्रकांतदादा म्हणाले, महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला नेहमी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचा हात दिला आहे. कर्नाटकला पाणी देण्यासाठी महाराष्ट्राने सकारात्मक भूमिका घेतली. सीमा भागातील बहुतांशी जनता कोल्हापूर, सांगली, मिरज, सोलापूर या महाराष्ट्रातील जिल्हय़ातील अनेक सवलतींचा लाभ घेतात. विशेषत: आरोग्यच्या चांगल्या सुविधा त्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सीमा भागातील जनतेला राज्यातील राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार विचाराधिन आहे. एकमेकांना सहकार्याची भूमिका घेऊन आजपर्यंत संबंध सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांने चुकीच्या पद्धतीने वक्त्यव्य करून जनतेच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सामजिक सलोखा बिघडू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची दखल घेतली. मंगळवारी कर्नाटक सरकारला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. प्रसंग पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू अशा इशराही मंत्री पाटील यांनी दिला.

सरकार कार्यकाळ पूर्ण करणार

राज्यातील महायुतीचे सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही. कार्यकाळ पूर्ण करू असा विश्वास पालकमंप्ती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीवरून आत्मक्लेश यात्रा काढली आहे.  संधी मिळेल त्या ठिकाणी शिवसेना सरकारचे वाभाडे काढत आहे. तर मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकित केले. याकडे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. एकनाथ खडसे यांचे वैयक्तीक मत असल्याचे त्यांनी सांगितले. लावास प्रकरणाबातत विचारले असता त्यांनी माहिती घेऊन सांगत असे मोघम उत्तर दिले.