|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रोशन बेगनी मुंबईत येऊन दाखवावे!

रोशन बेगनी मुंबईत येऊन दाखवावे! 

मालवण : कर्नाटक सरकारचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी मुंबईत येऊन दाखवावे. त्यांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणजे काय हे दाखवून देऊ. बेगना त्यांची औकात दाखवून देण्याची वेळ आली असून संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटकाच्या गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून परत पाठविण्यात येणार आहेत. शिवसेना संपूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होणार असून बेग यांनी कर्नाटकातील कोणतीही जागा सांगावी, आम्ही त्याठिकाणी येऊन ‘जय महाराष्ट्र’ म्हणून दाखवू, असा इशारा दूधवडकर यांनी दिला आहे.

येथील हॉटेल लिलांजली येथे मालवण तालुका शिवसेनेच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या दूधवडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे आदी उपस्थित होते.

बेळगावसह अखंड महाराष्ट्र होण्यासाठी मराठी बांधव त्रास सहन करीत असताना कर्नाटकच्या मंत्र्याने अशी दर्पोक्ती करणे म्हणजे मराठी माणसाला आव्हान देण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे बेग यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावे, त्याला त्यांच्या शब्दातच उत्तर दिले जाईल. बेळगावात मराठी बांधवांच्यावतीने सुरू असलेल्या लढय़ात शिवसेना सदैव सहभागी झालेली आहे. मी कालही बेळगावात जाऊन जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत, असे दूधवडकर यांनी स्पष्ट केले.

संघटनेत लवकरच फेरबदल!

मालवण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला आलेल्या अपयशाबद्दल बोलताना दूधवडकर म्हणाले, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱयांशी आपण आज बोललो आहे. हा अहवाल घेऊन पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी चर्चा करून तालुक्यातील संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील. जी पदे रिक्त आहेत, त्यांच्यावर तात्काळ नियुक्त्या केल्या जातील. यात कोणतेही संबंध पाहिले जाणार नाहीत, जो काम करणार नाही, त्याने स्वतःहून बाजूला व्हावे अन्यथा पदावरून मुक्त केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तब्बल पाच तास विजेविना

शिवसेना तालुका सभा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. ही सभा दुपारी 12 वाजता सुरू झाली. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने उपस्थित कार्यकर्ते उकाडय़ाने हैराण झाले होते. येथे आलेल्या आमदारांना कार्यकर्त्यांनी वीज समस्या सांगितली. यावेळी आमदारांनी तात्काळ वीज कंपनीच्या अधिकाऱयांना सभास्थळी बोलावून विचारणा केली. अधिकाऱयांनी लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे स्पष्ट केले. मात्र, सभा संपून कार्यकर्ते, पदाधिकारी घरी निघून गेले, तरी शहरातील वीजपुरवठा दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे शिवसैनिकांनीही नाराजी व्यक्त केली.

 

Related posts: