|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदी सरकारची तीन वर्षे आज पूर्ण

मोदी सरकारची तीन वर्षे आज पूर्ण 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि रालोआ सरकार शुक्रवारी आपली तीन वर्षे पूर्ण करत आहे. 26 मे 2014 या दिवशी या सरकारचा शपथविधी झाला होता. अनेक साहसी, परिवर्तनात्मक आणि तितकेच विवाद्य निर्णय हे या तीन वर्षांचे वैशिष्टय़ मानले जात आहे.

तिसऱया वर्षातील निर्णयांमध्ये नोटाबंदीचा निर्णय सर्वात महत्वाचा मानला गेला. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठय़ा बदलातून जावे लागले. 500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे दोन महिने देशात चलनतुटवडा निर्माण झाला होता. विरोधी पक्ष व विचारवंत यांनी हा निर्णय एक घोडचूक आहे, असा निष्कर्ष काढला होता, तथापि, अंतिमतः जनतेने त्रास भोगूनही तो स्वीकारल्याचे दिसून आले. याशिवाय वस्तू-सेवा कराच्या अंमलबजावणीचा आणि पाकविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णयही महत्वाचा ठरला.

पाकला धडा शिकविण्यासाठी जशास तसे धोरणावर भारताने या काळात भर दिला. तर चीनच्याही डोळय़ाला डोळा भिडविण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत ट्रंप यांचा विजय भारताच्या पाक आणि चीनसंबंधीच्या नव्या धोरणांना अनुकूल ठरत असल्याचे चित्र आहे. भारताने इस्रायलशीही अधिक मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत.

याशिवाय, रस्तेबांधणी, आरोग्य सेवा, गरीबांसाठी गृहनिर्माण, स्वच्छ भारत मोहीम, गरीबांसाठी गॅस जुळणी योजना, कृषी क्षेत्रातील प्रगती, मेक इन इंडिया आदी कार्यक्रमही यथायोग्य प्रकारे पुढे जात आहेत, असा दावा सरकारने केला आहे. चौथ्या वर्षीची आव्हाने पेलावयास आम्ही सज्ज आहोत, असेही सरकारने म्हटले आहे. येते दोन महिने देशभरात तिसऱया वर्षाच्या पूर्तीनिमित्त कार्यक्रम केले जाणार आहेत.

विरोधी पक्षांचे काहूर

सरकारच्या अनेक निर्णयांविरोधात विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली. संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे टीकेचे मुख्य विषय राहिले. देशातील सामाजिक परिस्थिती, दुर्बल घटकांवर होणाऱया अत्याचारांचा दावा, उत्तर प्रदेशातील जातीय दंगली, मोदींचे वर्चस्ववादी वर्तन, नोटाबंदीमुळे जनतेला झालेला त्रास इत्यादी मुद्दे विरोधकांनी मोठे करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हे वर्ष मोदींसाठी राजकीयदृष्टय़ाही उत्साहवर्धक ठरले. उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड इत्यादी राज्यात मोठा विजय मिळाला. पण पंजाब मात्र तितक्याच मोठय़ा पराभवाने हातातून निसटला. एकंदर, हे वर्ष मोदी सरकारसाठी बरेचसे गोड आणि थोडेसे कडू ठरले, असे तज्ञांचे मत आहे.

Related posts: