|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ

प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला आज प्रारंभ 

ऑस्ट्रियाचा थिएम व जर्मनीचा व्हेरेव्ह यांच्या कामगिरीकडे लक्ष

पॅरीस

येथील रोलॅंड गॅरोच्या रेड क्ले कोर्टवर रविवारपासून प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2017 टेनिस हंगामातील ही दुसरी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आहे. 2005 पासून स्पेनचा नदाल, स्वित्झर्लंडचे फेडरर, वावरिंका, सर्बियाचा जोकोव्हिक व ब्रिटनचा मरे यांनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत आपले वर्चस्व ठेवले होते. पण आता ऑस्ट्रियाचा 23 वर्षीय थिएम तसेच जर्मनीचा 20 वर्षीय ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह या स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या रविवारी इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत 20 वर्षीय व्हेरेव्हने सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोव्हिकला पराभवाचा धक्का दिला होता. त्याच प्रमाणे स्पेनच्या नदालवर विजय मिळवून खळबळ माजवली. या स्पर्धेत नदालकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते, त्यानंतर सर्बियाचा जोकोव्हिक व ब्रिटनचा मरे यांनाही जेतेपदाची संधी आहे. या तीन टेनिसपटूखेरीज थिएम, ऍलेक्सझांडेर व्हेरेव्ह सीडेड खेळाडूंना पराभवाचा धक्का देवू शकतील. एटीपीच्या गेल्या किमान 40 वर्षांच्या इतिहासात मानांकन यादीत यावेळी पहिले पाच टेनिसपटूंचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक आहे. या स्पर्धेत थिएमला मानांकनात सातवे स्थान मिळाले आहे. कॅनडाचा रेओनिक तसेच जपानचा निशीकोरी यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

स्पेनच्या नदालने या स्पर्धेत आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली असून त्याने नऊ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात थिएमचे नदाल बरोबर तीन सामने झाले. त्यापैकी बार्सिलोना आणि माद्रिद येथील स्पर्धांमध्ये नादालने थिएमला अंतिम फेरीत पराभूत केले तर रोममधील स्पर्धेत थिएमने नादालचा 6-4, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभवाचा धक्का दिला होता. गेल्यावर्षी या स्पर्धेत थिएमने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती पण त्याला उपांत्य सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिककडून पराभव पत्करावा लागला.

स्पेनच्या नदालला गेल्यावर्षी या स्पर्धेत मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तिसऱया फेरीतून माघार घ्यावी लागली होती. क्ले कोर्टवर नदालची मक्तेदारी असून त्याने आतापर्यंत क्ले कोर्टवर 72 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील त्याची कामगिरी दर्जेदार झाली असून आतापर्यंत त्याने नऊ वेळा चषकावर नाव कोरले आहे. नदालला यावेळी या स्पर्धेत थिमकडून अधिक सावधानता बाळगावी लागेल. थिएमने यावर्षी नदालची सलग 17 सामन्यांतील विजयी घोडदौड रोखली आहे.