|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जैतापूर प्रकल्पातील आंब्यामध्ये गोलमाल

जैतापूर प्रकल्पातील आंब्यामध्ये गोलमाल 

वार्ताहर / जैतापूर

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थानिकांच्या आंदोलनामुळे चर्चेत असतनाच आता आणखी एका नव्या विषयाची त्यात भर पडली आहे. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेच्या कुंपणामध्ये असलेल्या हजारो कलमांवरील आंब्याबाबत मोठा गोलमाल झाल्याची चर्चा सुरू आहे. सरकारच्या तिजारोत लाखोची भर घालू शकणाऱया या फळांनी कोणाची घरे भरली असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात आंबा कलमाच्या मोठय़ा बागा आहेत. अणुऊर्जा प्रकल्पासाठी जागा संपादीत करताना स्थानिकांना मोबदला देऊन ती खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमिनीवर असलेल्या कलमांच्या बागाही प्रकल्पाच्या अर्थात सरकारच्या मालकीच्या झाल्या. प्रकल्प येण्यापूर्वी या कलमाच्या बागा मालकांनी करारावर दिल्या होत्या. परंतु त्यावर आता मुळ मालक किंवा कराराने घेणाऱयांचा कोणताही अधिकार राहीलेला नाही.

या बागांमधून मोठय़ा प्रमाणावर आंबा उत्पादन मिळत असून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. गतवर्षी हंगाम संपता-संपता म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस प्रकल्पातील फळांचा लिलाव करण्यात आला. मात्र हाच लिलाव मार्च एप्रिल मध्ये झाला असता तर सरकारी तिजोरीत मोठी भर घालणे शक्य होते. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षी होताना दिसत असून हंगाम संपत आला तरी अजूनही लिलावाची कोणतीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे कुंपणाच्या आतील आंब्याचे नक्की काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गतवर्षी लिलाव केला मग यावर्षी का नाही, आणि हाच लिलाव मार्च एप्रिल मध्ये का केला जात नाही असे सवालही केले जात आहेत. यावर्षी आंब्यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबधिक कर्मचाऱयांनी परस्पर आंब्याची विकी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा उत्पादीत झालेला हजारो पेटी आंबा नेमका कोणाच्या घरात गेला, कोणाचे खिसे गरम झाले असा सवाल विचारला जात आहे.