|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » मुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा

मुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा 

अमेय वाघने यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला फेसबुकवरून जाहीर करून टाकलं, माझी व्हॅलेंटाईन मिथिला पालकर.. पण नंतर काही दिवसातच स्पष्ट झालं की हे दोघे प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन नाहीत तर वरूण नार्वेकर दिग्दर्शित आगामी ‘मुरांबा’ या चित्रपटातले आलोक आणि इंदू आहेत.

त्या क्षणापासून सोशल मीडियावर आणि एकूणच मराठी सिनेवर्तुळ तसेच चाहत्यांमध्ये आलोक आणि इंदू यांचा धुडगूस चालू आहे. या दोघांचा हा धुडगूस चालू असतानाच आलोकच्या आई बाबांनी, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत यांनी फेसबुकवर लाईव्ह जाणारा व्हिडिओ टाकून धमाल उडवून दिली. या व्हिडिओमुळे आलोक, इंदू आणि आलोकचे आई बाबा यांचं जग अत्यंत खुमासदार पद्धतीने लोकांसमोर आलं आणि त्याचं जोरदार स्वागत झालं. या पाठोपाठ आलं जसराज, सौरभ आणि ऋषीकेश यांनी संगीतबद्ध केलेले मिथिला पालकर आणि जसराज जोशी यांनी गायलेलं ‘मुरांबा’ हे गाणं आणि त्यानंतर अमेयच्याच आवाजातलं ‘चुकतंय’ हे गाणं.. यातून अमेयच्या आयुष्यात काहीतरी चुकतंय याची झलक पहायला मिळाली आणि मागोमाग आलेला मुरांबाचा ट्रेलर. त्यात तर आलोक आणि इंदूच्या ब्रेकअपचा बॉम्ब पडलाय. ब्रेकअप झालेले आलोक, इंदू आणि या दोघांच्या ब्रेकअपमध्ये घुसलेले आलोकचे आई बाबा असं त्रांगडं असलेला हा मुरांबा नेमका आहे तरी काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दशमी क्रिएशन्स, ह्यूज प्रोडक्शन्स आणि प्रतिसाद प्रोडक्शन्स निर्मित मुरांबा हा सिनेमा आई वडील आणि मुलं यांच्यातल्या नातेसंबंधाच्या बदलत्या स्वरूपाकडे तीक्ष्ण नजरेने आणि एका विशिष्ट विचाराने बघतो. मांडणीतला फ्रेशनेस आणि नाविन्य आल्हाददायक असलं तरी विचारातलं, निरीक्षणातलं गांभीर्य दाद देण्यासारखं आहे. सोळाव्या वर्षी वडील आणि मुलगा एकमेकांचे मित्र होतात म्हणे पण दोन्ही बाजूंकडून मैत्रीच्या मर्यादा आणि नियम पाळले जात नाहीत. अनुभव आणि सातत्याने बदलणारं बाहेरचं जग यातली जुगलबंदी टाळता आली तर बाप-मुलगा, आई-मुलगा, सासू-सून या नात्यांचा मुरांबा, त्यातील गोडी आयुष्यभर टिकू शकेल, हे सांगणारा हा खुमासदार सिनेमा आहे. तर व्हॅलेंटाईनला जाहीर झालेल्या अमेय मिथिला या जोडीचा आलोक-इंदू असा अवतार आणि आता त्यांचा ब्रेकअप असा हा मुरांबा आहे तरी कसा, ते येत्या 2 जूनला समजणार आहे.