|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ब्रिटनमध्ये 23 हजार संशयित दहशतवादी

ब्रिटनमध्ये 23 हजार संशयित दहशतवादी 

3000 जणांकडून धोका : 500 संशयितांची चौकशी, मँचेस्टरचा हल्लेखोरही होता संशयाच्या भोवऱयात

वृत्तसंस्था / लंडन

 मँचेस्टर येथील आत्मघाती हल्ल्यानंतर ब्रिटनमध्ये अजूनही दहशतवाद धोका कायम आहे. तेथील हेरयंत्रणेने देशात राहत असलेल्या 23 हजार संशयित दहशतवाद्यांची ओळख पटविली आहे. यातील 3000 जणांकडून धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या यातील 500 जणांची चौकशी तपास यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे.

द इंडिपेंडेंटने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा सध्या 500 संशयितांवर नजर ठेवून आहेत आणि त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 20 हजार इतर लोकांची पार्श्वभूमी देखील चौकशीचा भाग असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या संशयितांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांना ‘जोखीम’च्या वर्गवारीत ठेवण्यात आले आहे.

मँचेस्टरचा आत्मघाती हल्लेखोर लीबियन वंशाचा सलमान अबेदी गुप्तहेर यंत्रणा एमआय5च्या रडावर आधीपासून होता. यंत्रणेने त्याचे प्रकरण आढावा घेण्याजोगे असल्याचे मानले होते. परंतु अबेदीकडून कोणताही धोका असल्याचा इशारा यंत्रणेने दिला नव्हता.

सीसीटीव्ही फूटेज जारी

ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी आत्मघाती हल्ल्याची सीसीटीव्ही फूटेज जारी केले असून यात सलमान अबेदी एरिना ग्रँड कॉन्सर्टच्या अखेरीस स्फोट घडवून आणताना दिसून येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अबेदीविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अबेदी 18 मे रोजी हिंसाचारग्रस्त लीबियातून ब्रिटनमध्ये परतला होता.

11 जण ताब्यात

22 मे रोजी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 14 ठिकाणांची झडती घेतली असून संशयाच्या आधारावर 11 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आम्ही नॅशनल काउंटर टेररिजम पोलिसिंग नेटवर्क आणि देशाच्या हेरयंत्रणांसोबत मिळून चौकशी करत असून आम्हाला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

10 वर्षात पहिल्यांदाच कमाल धोका

पंतप्रधान थेरेसा मे यांनी 23 मेच्या रात्री आपल्या कार्यालयातून ब्रिटनला संबोधित केले होते. त्यांनी देशात कमाल पातळीवरील धोक्याचा इशारा जारी केला होता. यानंतर ब्रिटनच्या सर्व प्रमुख ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये दहशतवादी धोक्याची भीती सर्वोच्च पातळीवर व्यक्त करण्याची ही मागील 10 वर्षातील पहिलीच वेळ आहे. पूर्ण देशात 5 हजार लष्करी सैनिक तैनात करण्यात आले आहेत.