|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नोटाबंदी संबंधित सर्व माहिती द्या !

नोटाबंदी संबंधित सर्व माहिती द्या ! 

केंद्रीय माहिती आयोगाची सर्व विभागांना सूचना : तपशीलाभोवती पोलादी किल्ला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली          

नोटाबंदीच्या निर्णयामागच्या कारणांची माहिती देण्याची जबाबदारी सर्व शासकीय विभागांची असल्याचे वक्तव्य केंद्रीय माहिती आयोगाने केले आहे. नोटाबंदीवरून पोलादी किल्ला उभा करण्याच्या भूमिकेला स्वीकारणे अत्यंत अवघड असून तो बाहुबली देखील तोडू शकला नसता असे उद्गार माहिती आयुक्त श्रीधर आचार्यलू यांनी काढले. पंतप्रधान कार्यालय, रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने या निर्णयामागची कारणे जाहीर करावीत अशी मागणी करणारा आरटीआय अर्ज फेटाळल्याने माहिती आयुक्तांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात
आहे.

माहिती रोखण्याच्या कोणत्याही प्रयत्नामुळे अर्थव्यवस्थेबाबत गंभीर शंका उद्भवतील असे आचार्यलू यांनी पारदर्शकता मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच टिप्पणी करतेवेळी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी 8 नोव्हेंबर रोजी 1000 आणि 500च्या नोटा चलनातून रद्द ठरविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

अशी भूमिका पचनी पडणे कठीण

आचार्यलु यांनी आरटीआय अर्जदार रामस्वरुप यांच्या प्रकरणी निर्णय देताना 2015 चा लोकप्रिय चित्रपट बाहुबलीचा उल्लेख केला. कायद्याचे राज्य आणि एका लोकशाहीप्रधान देशात नोटाबंदीसारख्या जनतेशी निगडित प्रकरणात चारही बाजूने पोलादी किल्ला उभारण्याची भूमिका पचविणे कठीण असून हा किल्ला बाहुबली देखील भेदू शकणार नाही. असा दृष्टीकोन संपविण्याची गरज असल्याचे त्यांनी
म्हटले.

सर्व विभागांनी माहिती द्यावी

माहिती आयुक्तांनी पोस्ट विभागाला माहिती उपलब्ध करण्याचा आदेश दिला आहे. सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी देशाच्या प्रत्येक नागरिकावर प्रभाव टाकणाऱया प्रत्येक निर्णयाची माहिती जारी करावी. नोटाबंदीने प्रभावित झालेल्या प्रत्येकाला त्याच्याशी संबंधित माहिती, त्याची कारणे आणि जर कोणताही नकारात्मक प्रभाव पडला असेल तर त्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देण्याची सर्व प्राधिकरणांची नैतिक, घटनात्मक जबाबदारी असल्याचे आचार्यलु यांनी सांगितले.

Related posts: