|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आप्पांनी सांगलीतील राजकीय दहशत संपवली : सदाभाऊ खोत

आप्पांनी सांगलीतील राजकीय दहशत संपवली : सदाभाऊ खोत 

प्रतिनिधी/ सांगली

 स्व. राजारामबापू यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या बिजलीमल्ल पै. संभाजी पवार यांनी स्व. बापूंच्या वारसांना खांद्यावर बसवून सांगलीत आणले. पण, आप्पांच्या खांद्यावरून पाय लांब करत ते कधी पळाले कळालेच नाही. पण, पै. संभाजी पवारांना जनतेने एकटे सोडले नाही. आजही जनता त्यांच्याबरोबर आहे, असे मत व्यक्त करत सांगलीतील राजकीय दहशत आप्पांनीच मोडून काढली, असे उद्गार कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले.

माजी आमदार पै.संभाजी पवार यांचा अमृतमहोत्सवी जीवन गौरव सत्कार आणि त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱया राजकीय पैलवान या पुस्तकाचे प्रकाशन असा कार्यक्रम रविवारी झाला. याव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सदाभाऊ खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.पतंगराव कदम होते. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी पै. संभाजी पवार यांच्या कार्याचा गौरव करत चळवळीला दिशा देणारे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे एकमेव नेते असल्याचे स्पष्ट केले. स्व. राजारामबापू यांच्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया पै. संभाजी पवार यांनी झपाटून काम केले. सामान्य माणसाला सन्मान मिळवून दिला. शेवटपर्यंत मारूती चौक हेच कार्यालय ठेवले. त्यांनी केलेल्या कार्याची राजारामबापू यांना जाणीव होती. पण, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या स्व. बापूंच्या वारसांना आप्पांनी खांद्यावरून नाचवत सांगलीत आणले. खांद्यावरूनच त्यांनी पाय लांब करत केव्हा निघून गेले हे समजलेच नाही. पण, ते आज एकटेच पडले आहेत, असा टोला आ. जयंत पाटील यांना नाव न घेता मारला. त्यांनी टांग मारली तरी जनता आप्पांच्यासोबत आहे. अमृतमहोत्सवी जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित जनसमुदाय हेच दाखवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जावा म्हणण्यामुळे सगळेच गेले

डॉ. पतंगराव कदम यांनी भाषणात काढलेल्या चिमटय़ाचा धागा पकडत सदाभाऊ खोत म्हणाले, डॉ. कदम यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच भाषणे करून सर्वच निघून गेले. शेवटी मीच राहिलो. डॉ. कदम लोकांना सारखेच काम झाले आता जावा म्हणत असत, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे असणारे सर्वच केव्हा गेले समजले नाही. पण, आप्पांचा लोकसंचय जसाच्या तसा आहे. ऍड. व्यंकाप्पा पत्की यांना जीवाची बाजी लावून आमदार बनवल्याची आठवणही सदाभाऊंनी सांगितली. सांगलीतील राजकीय दहशत सर्वात प्रथम संभाजी पवार नावाच्या वाघाने संपवल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.  

यावेळी डॉ. पतंगराव कदम यांनी चौफेर टोलेबाजी करत आपल्या तीस वर्षांच्या राजकीय इतिहासत संभाजी पवारांसारखा आमदार पाहिला नसल्याचे सांगितले. प्रश्नासाठी थेट मंत्र्यांच्या अंगावरच धाऊन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना आवरण्याची जबाबदारी आपल्यावर होती. त्यामुळे आपणही फिक्सींग करत त्यांच्या मागण्यांवर धडाधड निर्णय घेतले. अशा आठवणी सांगतानाच गुंठेवारी प्रश्न, ऊस झोन बंदी आदी प्रश्नांवर निर्णय कसे घेतले याचे किस्से सांगितले.

त्रिमूर्ती का फुटली?

 संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की आणि प्रा. शरद पाटील ही जिल्ह्य़ात त्रिमूर्ती होती. पण, ही त्रिमूर्ती का फुटली याचे उत्तर आपल्याला आजही मिळाले नसल्याचे सांगत डॉ. कदम यांनी सर्वोदय कारखान्याच्या प्रश्नालाही जाता जाता स्पर्श केला. सर्वोदय कारखान्याची परवानगी, भूमिपूजन, उद्घाटन या सर्व घटनांचा आपण साक्षीदार  आहोत. काय भानगडी झाल्या आपल्याला माहीत आहेत, असे सांगत डॉ. कदम यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

 सत्ता ताम्रपट नाही, पाय जमिनीवर ठेवा

आपण मंत्री असताना खूप कामे केली. पण, त्याचा गवगवा केला नाही. सत्ता आज आहे. उद्या नसेल. एकेकाळी दोनच खासदार असणाऱया पक्षाची आज सत्ता आहे. त्यामुळे सत्तेचा ताम्रपट असल्यासारखे वागू नका. पाय जमिनीवर ठेवा, असा टोला डॉ. कदम यांनी व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांना लगावला. आजही आपले सरकारात वजन असल्याचे सांगितले. नशिबाने आणि कर्तृत्वाने सत्ता मिळणे यात फरक असल्याचाही चिमटा त्यांनी काढला.

 आप्पा म्हणजे माधुरी दीक्षित

गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी सुरूवातीपासूनच्या संभाजी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. खांद्याला खांदा लावून केलेली आंदोलने आणि कार्याला उजाळा दिला. पै. संभाजी पवार म्हणजे माधुरी दीक्षित अशी उपमा त्यांनी दिली. माधुरीच्या आकर्षणाप्रमाणे आप्पांचे आकर्षण कार्यकर्त्यांना कायम राहिल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही पै.संभाजी पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. आ.सुरेश खाडे यांनी तर पै.पवार हे आपले हृदय आहेत. दहा वर्षात त्यांनी मोठय़ा भावाची भूमिका पार पाडल्याचे सांगितले. आ. सुधीर गाडगीळ यांनी आपले आणि पै.पवार यांचे गेल्या चाळीस वर्षापासूनचे संबंध असल्याचे स्पष्ट केले. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पै. पवार यांचे नेतृत्व तयार होणे ही त्या काळातील जनतेची गरज होती, असे सांगितले. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, आ. उल्हास पाटील यांचीही भाषणे झाली. महापौर हारूण शिकलगार यांनी आपल्या कारकिर्दीतच आप्पांना जीवनगौरव देणे हे भाग्य असल्याचे सांगितले. तर नगरसेक गौतम पवार यांनी आप्पा हे आपले वडील नव्हे तर मार्गदर्शकच असल्याचे सांगितले. पै. शंकर पुजारी कोथळीकर यांनी पै. पवार यांच्या कुस्ती कारकिर्दीचा आढावा घेतला. यावेळी मनपाच्यावतीने मानपत्र देण्यात आले. तर सदाभाऊ खोत आणि डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते संभाजी पवार आणि सौ. रंजना पवार यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी आ.अनिल बाबर,आ.मोहनराव कदम,बापूसाहेब पुजारी, पृथ्वीराज देशमुख,बिराज साळुंखे  उपमहापौर विजय घाडगे गटनेते किशोर जामदार, नगरसेवक शेखर माने,राजेश नाईक, कांचन कांबळे, भाजपाचे शेखर इनामदार,निताताई केळकर, भारती दिगडे, प्रकाश बिरजे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, संजय बजाज,  कामगार नेते बापूसाहेब मगदूम, माजी महापौर सुरेश पाटील, रामभाऊ मासाळ,रामभाऊ घोडके, पृथ्वीराज पाटील, सतीश साखळकर, शैलेश पवार आदी उपस्थित होते.