|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सालेलीतील धनगर कुटुंबांना घरे खाली करण्याचे आदेश

सालेलीतील धनगर कुटुंबांना घरे खाली करण्याचे आदेश 

जलसंसाधन खात्याकडून नोटीस राज्य सरकारकडे न्याय मागण्याचा निर्णय

प्रतिनिधी/ पणजी

सालेली होंडा, सत्तरी येथील धनगर समाजातील दोन कुटुंबांना जमीन खाली करण्यासाठी घरे सोडून जाण्याविषयीची नोटीस बजावण्यात आल्याने या कुटुंबांमध्ये खळबळ माजली आहे.

यासंबंधी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बोमो मोटे यांच्यासह पीडित कुटुंबांनी कैफियत मांडली. याविषयी सरकारकडे न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस वरील कुटुंबांमधील श्रीमती ठकी वरक आणि श्रीमती शकुंतला झोरे उपस्थित होत्या. त्यांच्यावतीने पत्रकारांशी बोलताना श्री. मोटे म्हणाले की, वरील दोन्ही कुटुंबांना घरे सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासंबंधीची नोटीस जलसंसाधन खात्यातर्फे जारी करण्यात आली असून सर्व्हे क्रमांक 30/1 या भागातील जमीन खात्याच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट करताना या जमीनीवरील घरे 30 मे 2017 च्या आधी खाली करण्यात यावीत, असे नोटीसीत म्हटल्याचे मोटे यांनी सांगितले.

60 वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्य

याविषयी पुढे बोलताना मोटे म्हणाले की, सदर दोन्ही कुटुंबे या ठिकाणी 60 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून आहेत. या गोष्टी विचारात न घेता त्यांना नोटीस पाठविणे हा धनगर समाजावर अन्याय आहे. त्यामुळे ही कुटुंबे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यासंबंधी घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून धनगर बांधवांचे रक्षण करण्यासाठी सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी वरील दोन्ही कुटुंबांसह आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट आपण घेतली असून त्यांनी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात सदर नोटीस रद्द करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे मोटे यांनी सांगितले.