|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुचाकी आदळून चालक ठार

दुचाकी आदळून चालक ठार 

बांदा :  मुंबई-गोवा महामार्गावरील सटमटवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात बांदा निमजगावाडी येथील भालचंद्र बळीराम सावंत (50) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर करत आहेत.

 याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तोरसे-गोवा येथून बांद्याच्या दिशेने येत असलेले दुचाकीस्वार भालचंद्र ऊर्फ भाली बळीराम सावंत यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती वेगाने महामार्गाच्या बाजूला ठेवलेल्या सिंमेट पाईपमध्ये घुसली. या धडकेने सावंत यांच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर ते 20 फुटावर फेकले गेले. तर दुचाकीच्या पुढचा भागाचा चक्काचूर झाला.

 भरदुपारी झालेल्या अपघातानंतर मृतदेह बराच वेळ पडून होता. महामार्गावरून जाणाऱया वाहनचालकांनी याबाबतची खबर तेथे असणाऱया एका ग्रामस्थाला दिली. सरपंच बाळा आकेरकर यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांना कळविले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सरपंच आकेरकर उपस्थित होते. मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी आणल्यानंतर पंचनामा करून बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 मृतदेह सावंतवाडी येथील कुटिर रुग्णालयात नेण्यात आला. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शर्मा यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर करत आहेत.

 भालचंद्र सावंत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. भालचंद्र सावंत हे लाकूड व्यावासायिक असल्यामुळे बांद्याबरोबरच घारपी, असनिये या गावात ते परिचित होते.

अपघातांचे वाढते प्रमाण

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सटमटवाडी भागात आतापर्यंत झालेल्या मोटारसायकल अपघातात सहाजणांना प्राण गमवावा लागला. चौपदरी महामार्ग असल्याने वाहने सुसाट वेगाने धावतात. बांदा ते इन्सुली या भागात महामार्गावर जागोजागी दुभाजक तोडण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा अंदाज येत नाही. सोमवारचा अपघात हा महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱया पाईपमुळे झाल्याचे समोर येत आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामासाठी सिंमेट पाईप महामार्गालगत ठेवण्यात आले आहेत. मात्र, पाईप नसते तर हा अपघाताची तीव्रता कमी होऊन सावंत यांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.