|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » छत फाटलेय, दुरुस्त करायचे कुणी?

छत फाटलेय, दुरुस्त करायचे कुणी? 

प्रतिनिधी / रत्नागिरी

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील 701 प्राथमिक शाळांतील 1 हजार 337 वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजित 1372.50 लाख निधी अपेक्षित आहे. निधीअभावी शाळांच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक शाळांची पावसाळय़ापूर्वी दुरूस्ती होणे गरजेचेच आहे. पण त्याला निधी देणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रत्नागिरी दौऱयावर येऊन गेलेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही निधीबाबत उदासीनता दाखवल्याने ऐन पावसाळय़ात विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील छताच्या सुरक्षेची हमी घेणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

जिह्यातील प्राथमिक शाळा दुरूस्तीसाठी निधीची नितांत आवश्यकता आहे. 250 शाळांच्या दुरूस्तीसाठी सुमारे कोटय़वधीच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. शाळा दुरूस्तीसाठी यापूर्वी शिक्षण विभागाकडून साडेपाच कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा अलिकडे दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील शाळेत वर्गातील लाकडी बार मोडून पडल्याची घटना घडली होती. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये, यासाठी शाळांची दुरूस्ती मार्गी लागण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहे.

40 टक्के शाळांच्या इमारती जुन्या

शाळा दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन व्यतिरिक्त शासनाकडून निधीच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील सुमारे 701 प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीचा प्रश्न खितपत पडला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण पावणेतीन हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यातील 40 टक्के शाळांच्या इमारती जुन्या आहेत. नियोजित निधी व्यतिरिक्त अधिक तरतूद होत नसल्याने निधीचा प्रस्ताव रखडला असल्याचे सांगितले जात आहे.

प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने त्यासाठी पालकमंत्री रवेद्र वायकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. पण नुकत्याच रत्नागिरी दौऱयावर येऊन गेलेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी निधीबाबत उदासीनता दाखवल्याचे बोलले जात आहे. पावसाळा तोंडावर आला असताना कधीही आभाळ फाटेल, अशी स्थिती आहे. येत्या 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षालाही प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी धोकादायक व मोडकळीस आलेल्या शाळांची दुरूस्ती होणे नितांत आवश्यक आहे. पण निधीच नसल्याने शाळांची दुरूस्ती करणार तरी कशी, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे.