|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » घरफोडय़ा करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

घरफोडय़ा करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद 

प्रतिनिधी/ दापोली

दापोली शहरात 4 घरफोडय़ा करणाऱया टोळीचा दापोली पोलिसांनी मोठय़ा शिताफीने तपास लावला आहे. चौकशीत टोळीने या व्यतिरिक्त चिपळूणमध्ये 1 आणि कराड शहरात 3 घरफोडय़ा केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्याचा मान पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या नेतृत्वाखालील दापोली पोलीस पथकाच्या शिरपेचात खोवला गेला आहे. या टोळीकडून 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक होंडा कंपनीची मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण चार लाख 24 हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दापोली शहरात आठ तारखेपासून जालगावात दोन घरफोडय़ा झाल्या, तर शहरातील कोंड परिसरात एक घरफोडीचा प्रकार झाला होता. चौथ्या प्रकरणात घरफोडीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने कोणीच तक्रारीसाठी पुढे आले नव्हते. यामुळे अस्वस्थ झालेल्या दापोलीपोलीसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ केली होती. या गस्तीच्या वेळी 16 मे रोजी मध्यरात्री दीड वाजता जालगाव-पांगारवाडी येथे एकजण चालत असलेला दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव संतोष विष्णू जाधव असे सांगितले. त्याने चिपळूणला मुलगी आजारी असल्याने तिथे जायला निघालो आहे. आई-वडिलांसह आपण जालगाव ग्रामपंचायतीच्या बाजूला राहत असल्याचेपोलीसांना सांगितले.

एवढय़ा रात्री कोणतीही एस्टी नसताना चिपळूणला निघालेल्या या संतोष जाधवबद्दलपोलीसांना संशय आला. त्याचा पूर्व इतिहास जाणून घेण्यासाठी दुसऱया दिवशी जिल्हा गुन्हे अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा या नावाची व्यक्ती सांगली जिह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक या गावचा रहिवासी आहे. त्याच्या नावावर चिपळूण येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दापोलीपोलीसांनी त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या अनुभवताच त्याने भडाभडा गुह्याची कबुली दिली. गणेश उर्फ टकल्या दिलीप जाधव (23 वर्षे, रा. ओंड, ता. कराड) आणि अमोल शेळके (29 वर्षे, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) यांच्या साथीने आपण दापोली, चिपळूण आणि कराड येथे घरफोडय़ा केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक करण्यासाठी दापोली पोलिसांचे पथक कराड परिसरात गेले. या दोघांचा मोबाईल ट्रक करत पोलिसांनी त्यांचा यशस्वीपणे माग काढला. यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून दापोली पोलिसांना आंतरजिल्हा घरफोडी करणाऱया टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले. या तिघांना 27 मे रोजी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तीनही आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

या टोळीकडून 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक होंडा कंपनीची मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण चार लाख 24 हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अपरपोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पवार, बी. जे. धालवलकर, परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बेग, सहाय्यक पोलीस फौजदार एस. वाय. रहाटे, नागेश कदम, शिवाजी बांगर, पोलीस हेडकॉन्स्टेबल ए. पी. चांदणे, ए. ए. आंधळे, पोलीस नाईक एस. के. दिवाळे, मंगेश शिवगण, स्वप्निल शिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर कांबळे, ओमप्रकाश चव्हाण, राहुल सोलनकर, अण्णा येडे, राजेंद्र फुटक, सुनील पाटील, पंकज आघाव, सुवर्णा ढेरे यांचा या पथकात समावेश होता.

Related posts: