|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीची मधुरा मुकादम कोकणसह राज्यात प्रथम?

रत्नागिरीची मधुरा मुकादम कोकणसह राज्यात प्रथम? 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीची मधुरा अविनाश मुकादम हिने बारावी परीक्षेत सर्वाधिक 96.46 टक्के गुण मिळवत कोकण विभागात प्रथम स्थान पटकावल्याची माहिती हाती येत आहे. याचबरोबर मधुराची टक्केवारी राज्यातही अव्वलस्थानाची असल्याचे समजते. या उत्तुंग यशानंतर आई-वडिलांचा वारसा पुढे नेण्याची मनिषा व्यक्त करत मधुराने मेडिकलला जाणार असल्याचे ‘तरूण भारत’ला सांगितले.

मधुरा ही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बारावीमध्ये सर्वाधिक 96.46 टक्के गुण तिने प्राप्त केले आहेत. अभ्यासातील सातत्य, वर्षभर वर्गामध्ये पूर्ण हजेरी, याचबरोबर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच आई-वडील, भाऊ यांचे प्रोत्साहन मिळाल्याने आपण हे यश प्राप्त केल्याचे मधुराने सांगितले. दररोज दिवसभर अभ्यास, मात्र रात्री 9 नंतर अजिबात अभ्यास आपण केला नाही, असे सांगताना अभ्यासासह पोहण्याची, बॅडमिंटन खेळाची, तसेच वाचनाच्या आवडीतही खंड पडू न दिल्याचे मधुराने सांगितले.

मधुराला हे यश अपेक्षित होते. दहावीतही मधुरा 98.20 टक्केवारीने उत्तीर्ण झाली होती. 30 मे रोजी दुपारी निकाल हाती मिळाल्यानंतर साऱया मेहनतीचे चीज झाल्याने समाधान झाल्याची प्रतिक्रिया मधुराने व्यक्त केली. याचबरोबर आई डॉ. पौर्णिमा मुकादम, वडील डॉ. अविनाश मुकादम यांनीही मुलीच्या यशाबद्दल खूप आनंद झाल्याचे सांगितले. कुवारबाव येथे मुकादम यांचे हॉस्पिटल आहे. गेली 14 वर्षे मुकादम दाम्पत्य हॉस्पिटलद्वारे रूग्णसेवा करत आहेत. लहानपणापासूनच आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमधील वातावरणात वाढल्याने, तसेच मेडिकलची मनापासूनच आवड असल्याने आपणही आई-वडिलांचाच वारसा पुढे नेणार असल्याचे मधुराने व्यक्त केले.

सायन्स शाखेच्या मधुराला 650 पैकी 627 गुण मिळाले. यामध्ये इंग्रजी विषयात 91, फिजिक्स 96, केमिस्ट्री 93, बायोलॉजी 100, फिश प्रो. टेक्नॉलॉजी 199, तर पर्यावरण शिक्षण विषयात 48 गुण मिळाले आहेत.

भाऊ आदित्यचा वारसा जपला

मधुराच्या आई-वडीलांनीही गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून यशाची परंपरा सुरु केली होती. अविनाश-पौर्णिमा मुकादम यांचा सुपूत्र आदित्य यानेही 97.83 टक्के गुण मिळवत 4 वर्षांपूर्वी बारावीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या आदित्य कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलला असून एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. मधुराला आदित्यकडून स्पेशल टिप्स मिळाल्या व त्या उपयुक्त ठरल्याचे तीने सांगितले. मधुराच्या या यशाने आदित्यलाही आनंद झाला आहे. आदित्यच्या यशामागोमाग 4 वर्षानी बारावीमध्ये प्रथम येण्याची पुनरावृत्ती मधुराने केल्याने मुकादम कुटुंबिय आनंदी आहेत.

 

Related posts: