|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » घटकराज्य दिन सरकारी पातळीवर साजरा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार

घटकराज्य दिन सरकारी पातळीवर साजरा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याला घटकराज्य होऊन आज 30 वर्षेपूर्ण होत आहे. पण खंत याची वाटते की काही लोकांना याची आठवणच राहीली आहे. ही खुप दुर्देवी गोष्ट आहे. गोव्याला घटकराज्य मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांना विसरता कामा नये. म्हणून दरवर्षी गोवा घटकराज्य दिन सरकारी पातळीवरुन तसेच विधानसभेत साजरा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे गोवा विधानसभाचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजीत जेष्ठ पत्रकार व लेखक सुहास बेळेकर यांनी लिहलेल्या ‘गोव्याला घटकराज्य कसे मिळाले?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात प्रमुख पाहूणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सिमा रिसबुड, जेष्ठ पत्रकार राजू भिकारो नाईक, लेखक सुहास बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भविष्यात पुस्तकाला फार मोठे महत्व

पुस्तकाविषयी बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की पुस्तक लिहताना लेखकाने घेतलेले परीश्रम यात पूर्णपणे दिसून येत आहे. गोव्याच्या घटकराज्याविषयी लिहणे हे आव्हानात्मक काम आहे. हे पुस्तक पूर्णपणे अभ्यासू आहे. या पुस्तकातून शिकण्यासारखे खुप काही आहे. पुढील येणाऱया 50 वर्षात या पुस्तकाला खुप महत्व येणार आहे. घटकराज्याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. व मला असे वाटते की गोव्यातील प्रत्येक शिक्षण संस्थामध्ये, विद्यालयात, महाविद्यालयात, वाचनालयात तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात व विधानसभेत हे पुस्तक उपलब्ध असणे गरजेचे आहे. व त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

घटक राज्याच्या इतिहासाचा उत्कृष्ट संदर्भग्रंथ

गोवा मुक्तीनंतर गोव्यामध्ये घटकराज्यासाठी ज्या राजकीय व सामाजिक चळवळी झाल्या त्यांचा संपूर्ण सारांश या पुस्तकांमध्ये आहे. मी या पुस्तकाची प्रत वाचली आहे. एक उत्कृष्ठ संदर्भग्रंथ म्हणून याविषयांच्या संशोधकांना व वाचकांना वाचालया मिळेल. 1964 ते 1987 या कालावधीतील जवळपास सर्व घडामोडी या पुस्तकात आहे. तसेच त्या कालावधीतील काही राजकीय नेत्यांच्या प्रसिध्द भाषणांचाही समावेश आहे. अनेक भाषांचाही या पुस्तकात समावेश आहे. लेखकाची संशोधनवृत्ती, याविषयाबाबत अभ्यास, व चिकाटी या पुस्तकाव्दारे दिसून येते. असे, सिमा रिसबुड यांनी सांगितले.

गोव्याला 30 में 1987 साली घटकराज्य म्हणून भारतीय संघ राज्यात स्वतंत्र स्थान मिळाले. घटकराज्यामुळे आम्हाला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले. त्यापैकी आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फार मोठे आहे. त्यापुर्वी भाऊसाहेब बांदोडकर यांना आर्थिक निर्णय घेताना केंद्र सरकारच्या अनेक कटकटींना तोंड द्यावे लागत होते. सगळय़ा निर्णयांना केंद्राची मान्यता आवश्यक होती आणि ती मिळविणे म्हणजे जणू अग्निदिव्यच होते. मात्र गोवा घटक राज्यामुळे आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकलो, त्याचे परिणाम म्हणून आज गोवा देशातील एक विकसित राज्य ठरले आहे, असे पत्रकार राजू नाईक यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. कु. सानिया बेळेकर हिने पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. लेखक सुहास बेळेकर यांनी पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रभू कांबळी यांनी केले.

Related posts: