|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात जोरदार पर्जन्यवृष्टी

सिंधुदुर्गात जोरदार पर्जन्यवृष्टी 

सिंधुदुर्गनगरी : एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असतानाच सिंधुदुर्ग जिल्हय़ात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी संपूर्ण जिल्हय़ात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आकाशाकडे टक लावून बसलेला बळीराजा सुखावला आहे. उष्म्यामुळे हैराण झालेल्या जनतेलाही दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात सिंधुदुर्गात 58.27 मि. मी. च्या सरासरीने 466.2 मि. मी. पाऊस बरसला.

 वैभववाडी व कणकवली तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. बुधवारीही दिवसभर पाऊस सुरू होता. काही ठिकाणी झाडे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पावसाळय़ापूर्वीची शेतकऱयांची कामे अद्याप आटोपली नसल्याने शेतकऱयांची धावपळ उडाली आहे. कोकमचेही मोठे नुकसान झाले. पुढील 24 तासात कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नियोजित वेळेपेक्षा यावर्षी लवकरच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे दरवर्षी सात जूनला दाखल होणारा मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्तता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात 58.27 मि. मी. च्या सरासरीने एकूण 466.2 मि. मी. पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 210 मि. मी., कणकवली – 157 मि. मी., वेंगुर्ले – 13.2 मि. मी., मालवण – 13 मि. मी., देवगड – शून्य मि. मी., सावंतवाडी – 24 मि. मी., दोडामार्ग – 28 मि. मी., कुडाळ – 21 मी. मी. याप्रमाणे तालुकानिहाय पाऊस झाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे. पावसाळय़ापूर्वीची कामे अद्याप आटोपलेली नाहीत. कोकम काढून सुकवणीची कामेही संपलेली नाहीत. त्यामुळे कोकमचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारच्या पावसात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मात्र, मोठे नुकसान झाल्याची कुठेही नोंद नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सावंतवाडीत गटारे तुंबली, रस्त्यावर पाणी

सावंतवाडी  : पहिल्याच पावसात शहरातील मुख्य रस्त्यावरील पालिकेच्या जवळच स्टेट बँकेकडे जाणाऱया मार्गावर गटारातील पाणी तुंबल्याने या परिसरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. बँकेकडे जाणाऱया मार्गावरच पाणी साचल्याने ग्राहकांचे हाल झाले. वाहनचालकांनाही कसरत करावी लागली. शहरातील वैश्यवाडा येथे नारळाचे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. मात्र, कोणतीही हानी झाली नाही. रस्त्यावर पडलेला माड आरोग्य सभापती आनंद नेवगी यांनी पालिका कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने बाजूला केला. पावसाचे आगमन होताच रेनकोट, छत्र्या, प्लास्टिक खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

जांभवडेत नव्या पुलाचा भराव वाहून गेला

कुडाळ : तालुक्यात जांभवडे-भटवाडी येथे जाण्यासाठी गडनदीवर नव्याने बांधलेल्या पुलाला जोडरस्ते व्यवस्थित न केल्याने पहिल्याच पावसात भराव वाहून गेला व तेथील साकव तोडल्याने भटवाडीकडे जाणारा मार्गच बंद होऊन लोकांची गैरसोय झाली आहे. गेल्यावर्षी या पुलाचे भूमिपूजन करून पिलर्स उभारण्यात आले. यावर्षी पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण केले. मात्र, ठेकेदाराने रस्ता व पूल या दरम्यानच्या भरावाचे काम वेळीच पूर्ण केले नाही. भराव व्यवस्थित न केल्याने पहिल्या पावसातच काही भराव वाहून गेला. त्यामुळे पुलावरून जाणे अवघड बनले आहे.

माणगाव खोऱयात पावसाचा जोर

कुडाळ : मंगळवारी रात्रीपासून कुडाळ शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरात रात्री विजेचा लपंडाव सुरू होता, तर ग्रामीण भागात बऱयाच ठिकाणी वीज गायब झाली आहे. कुडाळ पोलीस ठाण्याजवळ बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास विजेचा एक खांब मोडून पडला. सुदैवाने तेथे बसलेली मासेविक्रेती दुसरीकडे गेल्याने अनर्थ टळला. माणगाव खोऱयात कर्ली नदी प्रवाहित झाली असून आंब्रड, घोडगे, शिवापूर भागात पावसाचा जोर जास्त आहे.  माणगाव खोऱयासह घोडगे, जांभवडे, आंब्रड, घावनळे भागात वीजपुरवठा खंडित झाला. काल दुपारी खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. माणगाव खोऱयात मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा खंडित झाला. घावनळे दशक्रोशीतही वीज गायबच होती. कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील गटारच गायब झाल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्यासाठीचे गटार खोदाई न केल्याने पावसाळय़ात मुख्य रस्ता खड्डय़ांतच बुडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

देवगडात वीज, दूरध्वनी सेवा ठप्प

देवगड : वादळी वाऱयासह झालेल्या मुसळधार पावसामुळे देवगडमधील वीज व दूरध्वनी सेवा ठप्प झाली. रात्रीपासूनच तालुक्यात वीज पुरवठा खंडित होत होता. सकाळी 10 वाजल्यापासून देवगडात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती.

सासोली, पणतुर्ली, मांगेली अंधारात

दोडामार्ग  : तालुक्यात काल मंगळवार रात्रीपासून संततधार कोसळणाऱया मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. वादळी पावसासह सर्व गावांना झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मांगेलीसह पणतुर्ली गावात वाऱयामुळे झाडे व वीज खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे  मंगळवारपासून वीज खंडित झाली. मांगेली येथे विजेचे खांब दोन घरांवर कोसळले. सासोली, पणतुर्ली या ठिकाणी मोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तालुक्यातील भेडशी बाजारपेठेत रस्त्याच्या बाजूचे गटार साफ नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. दोडामार्ग बाजारपेठेसह भेडशी बाजारपेठेतून प्लास्टिक पिशव्या, कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. सर्वत्र नदीनाले प्रवाहित झाले आहे.

कलमठला वीज पडून दोन लाखाचे नुकसान

कणकवली : तालुक्यात मंगळवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने बुधवारी सकाळपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी केले. मंगळवारी रात्रीच्या वादळी वाऱयासहच्या पावसात शहरासह तालुक्यातील अनेक भागात वीज वाहिनीवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. कलमठ येथे वीज पडल्याने दोन घरातील इलेक्ट्रिकची उपकरणे जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. महामार्गासह काही अंतर्गत मार्गांवरही झाडे पडली.

कणकवली शहरासह सांगवे, हरकुळ बुद्रुक, शिवडाव, नांदगाव, ओटव, माईण, पावाचीवाडी, सावडाव, बेळणे, कलमठ, तरंदळे, वरवडे, हुंबरठ, हळवल, शिरवल, कसवण-तळवडे, शिरवल, सातरल, आशियेसह इतरही काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे, आर. बी. सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱयांनी भर पावसातही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. बुधवारी सायंकाळपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. विजेमुळे जानवली-नीलम्स कंट्रीसाईड येथील ट्रान्सफॉर्मरही जळाला. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे कामही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. 132 केव्ही खारेपाटण लाइनमध्येही बिघाड झाल्याने काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

कलमठ येथे वीज कोसळल्याने सुहासिनी पेडणेकर व दर्शना पेडणेकर यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वायरिंग, मीटरसह सर्व इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. तलाठी आर. ए. निग्रे यांनी पंचनामा केला असून सुहासिनी यांचे 90 हजार, तर दर्शना यांचे 89 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, महेश लाड, युवक काँग्रेसचे संदीप मेस्त्राr आदी उपस्थित होते.

फोंडाघाट : गांगेश्वर येथे घरावर झाडाच्या फांद्या पडल्याने मंगेश सावंत यांचे 4480, तर उदय सावंत यांचे 3025 रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. मात्र, अन्य कुठेही नुकसानीची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत नव्हती. जानवली, हुंबरट येथे मंगळवारी रात्री रस्त्यांवर झाडे पडली.  ती तातडीने बाजूला करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

शिरोडा देऊळवाडीत घरात पाणी शिरले

शिरोडा  : शिरोडा दशक्रोशीला बुधवारी पावसाने झोडपून काढले. बाजारपेठेतील दुकानात पाणी घुसले, तर देऊळवाडीत घरात पाणी शिरले. वीजपुरवठा खंडित झाला होता. काहीठिकाणी वादळी वारा सुरू होता. संततधार पावसाने बाजारपेठेतील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. गटारे तुडुंब भरून वाहत होती. देऊळवाडी येथील मारुती मंदिरात तसेच कब्रे यांच्या घरात पाणी शिरले. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. वेंगुर्ले शहरासह तालुक्यातही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.

बांद्यात 24 तासानंतर वीज

 बांदा : बांदा-शेर्ले परिसरातील वीजपुरवठा 24 तासापेक्षा अधिक काळ खंडित होता.  वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ववत करण्यात आला. इन्सुली आरटीओ व बांदा भागात वाहिनीत बिघाड असल्यामुळे वीजपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले. बांदा खेमराज प्रशालेत जनरेटरच्या सहाय्याने निकाल पाहावा लागला. बुधवारी सकाळी तीच अवस्था होती. विजेचा लपंडाव सुरुच होता. त्यामुळे वीज उपकरणांना धोका निर्माण झाला होता. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बांदा-शेर्ले भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Related posts: