|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात मान्सूनपूर्व धुवाधार पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व धुवाधार पाऊस 

प्रतिनिधी/ पणजी

मान्सूनपूर्व पावसाने राज्याला बुधवारी अक्षरश: झोडपून काढले. राजधानी पणजीत सायं. 5.30 पर्यंत तब्बल सव्वापाच इंचाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे राजधानीतील अनेक रस्ते पाण्याखाली बुडाले. गटारे तुंबली. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस व वादळीवाऱयामुळे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा ही खंडित झाला. जोरदार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. आगामी 48 तासांत राज्यात सर्वत्रच मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मान्सूनपूर्व पावसाने राज्याला बुधवारी झोडपून काढले. पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने सकाळी उग्ररुप धारण केले. दुपारी 12च्या दरम्यान जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस सुरु झाला. पणजीतील बहुतेक गटारे कचऱयामुळे तुंबली. 18 जून रस्ता, पणजी महापालिका, सरस्वती इमारत, चर्च चौक इत्यादी परिसरात सर्वत्र पाणी तुंबले. पणजी बसस्थानक परिसर आणि पाटो येथे पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली.

पणजी वेधशाळेचे संचालक एम. एल. साहू यांनी सायंकाळी सांगितले की दक्षिण महाराष्ट्र ते केरळ पर्यंतच्या परिसरात पावसाळी ढगांचा एक मोठा पट्टाच तयार झाला होता त्याचे परिणाम म्हणून गोव्यात मुसळधार पाऊस पडला. आजही राज्यात काही भागात मुसळधार तथा काही भागात हलक्या सरी कोसळतील. सध्याचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. केरळच्या काही भागात मान्सून पोहोचलेला आहे. गोव्यातला पाऊस हा मान्सूनच्या अगोदर पडलेला पाऊस असून आगामी 24 तासांत जोरदार पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले

वाहनांचे नुकसान, वीज यंत्रणेवर परिणाम

मान्सूनपूर्व जोरदार वादळीवाऱयासह पडलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पणजीत स. 8.30 ते सायं. 5.10 या दरम्यान 136 मिमी. म्हणजे तब्बल सव्वापाच इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. अनेक भागात मुसळधार पाऊस पडलेला असून त्या त्या परिसरातील नोंद आज येईल. जोरदार वादळी वाऱयासह पडलेल्या पावसाने राज्यातील जनजीवन विस्कळीत तर झालेच. शिवाय अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. कुठ्ठाळीत एका गाडीवरच वृक्ष कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला. जोरदार पावसामुळे व अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या वीज खांबावर येऊन पडल्याने राज्यातील वीज यंत्रणेवर परिणाम झाला. अनेक भागात सकाळपासून वीज गायब झाली. मंगळवारी सायंकाळी अनेक भागात पाऊस झाल्यानंतर फोंडा वीज यंत्रणेतील बिघाडामुळे सांखळी परिसरात 5 तास वीजपुरवठा बंद झाला. तातडीने दुरुस्ती केल्यानंतर मध्यरात्री उशीरा वीज प्रवाह सुरु करण्यात आला.

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे जनतेला उकाडय़ापासून दिलासा मिळाला.

Related posts: