|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » म्हातारपणची काठी

म्हातारपणची काठी 

नुकतीच एक बातमी वाचली. शंभरहून अधिक हिंदी सिनेमात काम केलेल्या एका अभिनेत्रीला तिच्या मुलाने रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारांसाठी पैसे भरायचे होते. पैसे घेऊन येतो असे सांगून मुलगा पळून गेला. तिच्या मुलीला रुग्णालयाने फोन केला तेव्हा मुलीने राँग नंबर असे सांगून तो फोन कट केला. अपत्यांनी टाळल्यामुळे एकाकी पडलेल्या या अभिनेत्रीची सद्यस्थिती करुणाजनकच आहे. तिच्या मुलामुलीची काही बाजू असेल तर ती ठाऊक नाही. 

आपल्याकडे बहुतांश कुटुंबात आईवडील आणि त्यांची मुले-सुना-नातवंडे एकत्र असतात. क्वचित मतभेद झाले तर विभक्त होतात आणि काही लोक वृद्धाश्रमात जातात.

पाश्चात्य देशात जवळपास सारेच वृद्ध वृद्धाश्रमात जातात. पण त्यांची सामाजिक स्थिती निराळी आहे. तिथे मूल जन्माला येते तेव्हा प्रसूतीची काळजी, शिक्षणाचा भार शासन घेते. मूल सज्ञान झाले की लगेच विभक्त होते आणि कमवायला लागते. मुलीदेखील स्वतःच्या लग्नाचा भार आईबापांवर टाकत नाहीत. मूल होणे आईवडिलांना फारसे तोशीसकारक नसते. मुले-मुली फक्त सज्ञान होईतो (मोठा आर्थिक भार न टाकता) पालकांपाशी असतात. पालक त्यांच्याकडून वृद्धपणी आधाराची अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र अपत्यांचे प्रेम, सहवास त्यांना हवाहवासा वाटतो आणि ते नैसर्गिकच आहे.

आपल्याकडे उलट स्थिती आहे. आईवडील मुलांना जन्मल्यापासून किमान तीन दशके खस्ता खाऊन, पोटाला चिमटा घेऊन सांभाळतात. त्यामुळे त्यांना मुले ही म्हातारपणीची काठी वाटणे योग्य आहे.

चित्रपट किंवा अन्य कलाकार चलतीच्या छोटय़ा काळात भरपूरच कमावतात. तो पैसा नीट राखला आणि व्यसने टाळली तर म्हातारपणी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येत नाही. पण दुर्दैवाने तरुणपणी हे सुचत नाही. सुचवणारा भेटत नाही. बातमीत वाचलेल्या तपशिलानुसार त्या अभिनेत्रीने शंभर हिंदी चित्रपटात काम केले तेव्हा पुरेसे मानधन मिळाले असणार. त्यामुळे मुंबईत ती स्वतःचे घर घेऊ शकली. तिने थोडी रक्कम पेन्शनच्या आणि आरोग्य विम्याच्या पॉलिसीत गुंतवली असती तर आज तिला मुलामुलींची गरजच पडली नसती.

गुंतवणुकीचे शहाणपण प्रत्येकापाशी नसते. अस्थिर व्यवसायातल्या कलाकारांना मिळणाऱया मानधनातून प्रॉव्हिडंट फंडाप्रमाणे काही रक्कम कापून त्यातून पेन्शन आणि आरोग्य विमा मिळाला तर समाजातले हे प्रश्न कमी होतील असे वाटते.

Related posts: