|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » माजी हॉकीपटूने 21 मुलींना घेतले दत्तक

माजी हॉकीपटूने 21 मुलींना घेतले दत्तक 

वृत्तसंस्था/ रोहतक

सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणाऱया भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या पावलावर पाऊल ठेवत माजी हॉकी खेळाडू अजीत पाल नंदाल यांनी हरियाणामधील 21 मुलींच्या शिक्षणांचा खर्च उचलला आहे. नांदल यांनी बुधवारी रोहतक जिल्हय़ामधील बोहर गावातील या मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली. या सर्व मुली सहावी ते बारावी इयत्तेत शिकत असून त्या सरकारी शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.

नांदल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आपण फक्त या मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार नाही, तर त्यांना खेळाचे प्रशिक्षण देणार आहोत. क्रीडा स्पर्धासाठी लागणारे सर्व साहित्यासोबत या मुलींना सर्व सामानही उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नंदाल यांची स्वत:ची जिम असून गावातील सरकारी शाळेत शिकणाऱया आणि क्रीडा क्षेत्रात रस असणाऱया विद्यार्थिंनीना जिममध्ये मोफत व्यायाम करण्याची मुभा असेल, अशी घोषणाही नंदाल यांनी केली आहे.

नंदाल यांना मुलींना दत्तक घेण्याची प्रेरणा गौतम गंभीरकडून मिळाली. 2020 च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी केंद्र सरकारच्या टास्क फोर्समध्येही नंदाल यांचा समावेश आहे. नंदाल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रेहतकचे पोलिस अधीक्षक पंकज जैनदेखील उपस्थित होते. मुलांपेक्षा मुलींमध्ये क्षमता जास्त असून त्या सर्व क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. क्रीडा क्षेत्रासाठी पालकांनी मुलींमधून गुण हेरुन त्यादिशेने तिला प्रशिक्षण दिले पाहिजे, असे जैन यांनी यावेळी सांगितले.