|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत आठ शेतकऱयांना अटक

मिरजेत आठ शेतकऱयांना अटक 

प्रतिनिधी/ मिरज

शेतकऱयांच्या शेतीमालाला हमी द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारसी लागू करा, अशा मागण्या करीत गुरूवारी सकाळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हैसाळ उड्डाण पुलावर आंदोलन केले. मात्र, जिल्हय़ात लागू असलेल्या बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल आठ शेतकऱयांना अटक करण्यात आली.

   शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. शहरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही गुरूवारी सकाळी सात वाजता म्हैशाळ उड्डाण पुलावर घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱयांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करा, वीज बिल माफ करा, यांसह अन्य मागण्यांच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.

   सध्या राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महादेव कोरे, कमलेश कांबळे, अशोक लांडगे, कृष्णराव पवार, सुरेश लांडगे, बाबुराव चौगुले, इमाम सौदागर, महादेव पाटील या आठ जणांना अटक केली. या आठ कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

   त्यानंतर महादेव कोरे म्हणाले, की शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असताना ते दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकरी त्याला घाबरणार नाही. यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.