|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » म्युच्युअल फंड तक्रारीत 40 टक्के वाढ

म्युच्युअल फंड तक्रारीत 40 टक्के वाढ 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील दिग्गज म्युच्युअल फंड कंपन्यांविरोधातील तक्रारींत 2016-17 या आर्थिक वर्षात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांकडून 17,569 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱयांच्या संख्येत वाढ होत आहे, तशीच वाढ तक्रारींमध्ये होत आहे.

गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये माहितीतील चुका न सुधारणे आणि वारसदार, पॅन तपशील आणि पत्त्यामध्ये बदल न करणे यासारख्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षात नव्याने गुंतवणूक करणाऱया लोकांमध्ये वाढ झाल्याने तक्रारींची संख्या वाढल्याचे क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. याव्यतिरिक्त गुंतवणूकदारांकडून चुकीची माहिती पुरविण्यात आल्याने आणि अर्ज दाखल करताना राहिलेल्या चुकांमुळे तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, आयसीआयसीआय प्रुन्डेन्शियल, एचडीएफसी, रिलायन्स, बिर्ला सनलाईफ आणि एसबीआय या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकूण तक्रारी 17,569 वर पोहोचल्या आहेत. 2015-16 या आर्थिक वर्षात 12,579 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.

 एसबीआय म्युच्युअल फंडच्या तक्रारदारांमध्ये चार पट वाढ होत 6,924 वर पोहोचली. यानंतर बिर्ला सनलाईफ म्युच्युअलच्या तक्रारींत 51 टक्क्यांनी वाढ होत 1,831 आणि आयसीआयसीआय म्युच्युअल फंड तक्रारी 2 टक्क्यांनी वाढत 4,648 वर पोहोचल्या आहेत. तर एचडीएफसी म्युच्युअल फंड तक्रारींत 24 टक्क्यांनी घसरण होत 2,857 आणि रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये 10 टक्क्यांची कमी येत 1,309 वर पोहोचल्या आहेत.

एकाच गुंतवणूकदाराचे अनेक खाती असण्यास परवानगी असल्याने त्यामध्ये वाढ झाली आहे. 2.23 कोटी खात्यांवरून आता 2.72 कोटी म्युच्युअल फंड क्षेत्रात खाती आहेत.

Related posts: