|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भुयारी गटर योजनेत आता वाद नको – आमदार सुरेश हाळवणकर

भुयारी गटर योजनेत आता वाद नको – आमदार सुरेश हाळवणकर 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

भुयारी गटर योजनेसाठी वाढीव भागाचा डीपीआर हा एका ठिकाणी बसून गुगल मॅपद्वारे केला गेला आहे. त्यामुळे यामध्ये बऱयाचशा त्रुटी राहील्या असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरावरून भुयारी गटरच्या पाईपा जाणार असल्य़ाचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराला डीपीआर तयार करणारा कन्सल्टंट जबाबदार असुन यासाठी कोणतीही ठिकाणे या योजनेतुन वगळू नका. यासाठी कितीही निधी लागला तरी तो उपलब्ध करुन देवू पण भुयारी गटरचे काम आता कोणत्याही वादाशिवाय पुर्ण करा असे निर्देश आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले. पालिकेत झालेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पालिकेच्या कामकाजासंदर्भात सर्वच खातेप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला.

सुरवातीला कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी प्रास्ताविक करुन आमदार हाळवणकर यांच्या आढावा बैठकीमागील उद्देश सांगितला. यानंतर सर्वच खात्याच्या खातेप्रमुखांकडून शहरात सुरु असलेल्या व प्रस्तावित कामाचा लेखाजोखा घेण्यात आला. यामध्ये पालिकेतील बांधकाम विभाग, मार्केट विभाग, आरोग्य विभाग, नगररचना विभाग, प्रधानमंत्री आवास योजना कक्ष यासह विविध विभागाच्या खातेप्रमुखांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

आवळे मैदान येथील स्टेडीयम व मोठे तळे येथील शॉपिंग सेंटर व काँप्लेक्सचा प्रस्ताव, शहापुर खण विकसित करणे, पावसाळयात ज्या आठ ठिकाणी पाणी साचते अशा रस्त्यांचे कामासाठीचा 6 कोटी रुपयांचा प्रस्ताव तसेच लिंबु चौक व टाकवडे वेस येथे महिलांसाठी उभारण्यात येणाऱया महिला शौचालयाचा प्रस्ताव याबाबत आमदार हाळवणकर यांनी नगरअभियंता बापुसाहेब चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी पावसाळा तोंडावर आला असल्याने पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करुन तेथे पाणी काढण्यासाठी उपायोजना करण्याचे  काम त्वरीत करावे असे आमदार हाळवणकर यांनी सांगितले.

ग्रीन सिटी योजनेअंतर्गत झाडे लावणे व ती जतन करण्याच्या कार्यवाहीची महिती अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी दिली. या पावसाळयात एकुण 30 हजार झाडे लावणे व त्याचे जतन करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने 28 लाख रुपये खर्चाची निविदा मंजुर होवून त्या कामाची वर्क आर्डर दिली आहे. हे काम सुरु होणार असुन लवकरच शहरातील उद्याने व इतर ठिकाणी झाडे लावण्याचे काम सुरु होईल असे सांगितले. काळा ओढा परिसरातील 10 हजार झाडे लावण्याची निविदा मंजुरीसाठी पाठवली आहे. तसेच 25 जुन रोजी उद्यानातील   वृक्षारोपणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल योजनेबाबतच्या लाभार्थ्यांच्या त्रुटीबाबतही यावेळी चर्चा झाली. यामध्ये या योजनेसाठी बांधकाम परवाण्याची अट शिथील करणे, शेत जमीनीमध्ये बांधकाम करण्यासाठी नगरपलिकेच्या क्षेत्रामध्ये परवानगी देणे असे अनेक विषय चर्चेला आले. घरकुल कक्षाचे अधिकारी सुभाष देशपांडे यांनी या आवास योजनेसाठी म्हाडा कडून मान्यता मिळत नाही. तसेच झोपडपट्टी पुर्नवसन करण्याबाबत सर्वेक्षणाचा ठराव आला नसल्याचे सांगितले. यावर हा ठराव संध्याकाळ पर्यंत या ठरावाची प्रत त्यांना देवून 13 हजार 800 झोपडपट्टी धारकांना घरकुल योजनेसाठी लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आमदार हाळवणकर यांनी सांगितले. 95 साला पुर्वीच्या झोपडपट्टीधारकांचे राहत्या जागेवर पुर्नवसन करणे, रजिस्टर खरेदी दस्तावेज हा घरकुल लाभार्थ्यांनी अर्जासोबत जोडल्यास तो अर्ज स्विकारण्याच्या सुचना दिल्या.

 फेरिवाल्यांसाठी मंजुर झालेल्या हॉकर झोनची अंमलबजावणी करणे, शहापुर येथील क्रीडासंकुल, स्टेडियमच्या वरच्या बाजुला सौर उर्जा पॅनेल बसवणे, महिलांसाठी शहरात अणखी 10 ते 15 सार्वजनिक शौचालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, इचलकरंजीसाठी मंजुर असलेल्या सहकार न्यायालयासाठी जागा देण्याबाबत कार्यवाही करणे, शिक्षण मंडळाचे कार्यालय लवकरात लवकर पालिकेत आणणे अशा अनेक योजनांचा आढावा घेवून त्यावर योग्य ते निर्देश आमदार हाळवणकर यांनी दिले. वारणा योजनेची सर्व कार्यवाही पुर्ण झाली आहे. यासाठी निविदा काढणे, पाण्याचे आरक्षण, जागा विकत घेणे या सर्व बाबी पुर्ण होवुन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. पण या योजेनला विरोध असणाऱया वारणेतील गावकऱयांशी संवाद साधुनच या कामाला सुरवात करण्यात येईल असेही यावेळी आमदार हाळवकर यांनी सांगितले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना व आयजीएम हॉस्पिटलच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी आमदार अशोक जांभळे, पक्षप्रतोद तानाजी पोवार, बांधकाम सभापती लतीफ गैबान, महिला व बालकल्याण सभापती नेहा हुक्कीरे, मागासवर्गीय समिती सभापती सौ. संध्या बनसोडे, अशोकराव स्वामी, नगरसेवक युवराज माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

अनेक आरोप प्रत्यारोपाने भुयारी गटरचा विषय सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 40 कोटी व 21 कोटी असा निधी प्राप्त  झाला आहे. पण हे काम आतापर्यंत 50 टक्के पुर्ण झाले असुन या कामाचा ठेकेदार उत्कर्ष पाटील याने या कामाचा दर्जा चांगला राखला नाही. या योजनेतील  कामाचा दर्जा तपासण्यासाठी आता पालिकेनेच त्यांच्या अधिकाऱयांची एक समिती नेमुन या कामावर देखरेख ठेवावी. चुकीचा व केवळ गुगल मॅपवर अवलंबुन केला  गेलेल्या डीपीआर मुळे या कन्सल्टंटने केंद्र, राज्यशासन व नगरपालिकेची फसवणुक केली आहे. पण आता जरी यासाठीचा खर्च वाढला असला तरी या कामामध्ये असणारा मलनिस्सारण प्रकल्प हा देशातील एकमेव असा प्रगत प्रकल्प होणार आहे. यामधुन प्रक्रीया होवुन बाहेर पडणारे पाणी हे थेट नदीत सोडण्यासारखे शुध्द होणार आहे. असे आमदार हाळवणकर यांनी सांगितले.

Related posts: