|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाटमारी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांनी घबराट

वाटमारी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांनी घबराट 

प्रतिनिधी/ बेळगाव

वाटमारी व चेन स्नॅचिंगच्या घटनांनी व्यापारी व नागरिक भयभीत झाले आहेत. महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहर व उपनगरात पोलिसांची गस्त खरोखरच सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकाकी महिलेचा खून,  चेन  स्नॅचिंग व वाढत्या घरफोडय़ांमुळे सर्वसामान्य  नागरिक भयभीत झाले आहेत.

गुरुवारी रात्री केळकर बाग व मारुती गल्ली येथे घडलेल्या दोन घटनांमुळे पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभा ठाकला आहे. दुचाकीवरुन जाणाऱया व्यापाऱयाजवळील 10 लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आली आहे. रात्रीचे जेवण आटोपून आपल्या मुलीसमवेत फिरायला गेलेल्या देशपांडे गल्ली येथील एका महिलेच्या गळय़ातील 17.25 ग्रॅम वजनाचे चेन व मंगळसूत्र पळविण्यात आले आहे.

पहिली घटना गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास केळकरबार येथील नवगृह मंदिराजवळ घडली आहे. अनिल पोरवाल (वय 50) हे नरगुंदकर भावे चौक परिसरातील आपले दुकान बंद करुन रामदेव गल्ली येथील घरी परतत होते. तत्पूर्वी अनिल गोंधळी गल्ली येथील आपल्या भावाकडे गेले होते. गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास केळकर बाग येथील नवग्रह मंदिराजवळ दोघा भामटय़ांनी अडविले. त्यांचा चेष्मा काढुन डोळय़ात मिर्चीपुड टाकण्यात आली व 9 लाख 88 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लांबविण्यात आली.

लुटमारीच्या या घटनेनंतर दोनही भामटे मोटार सायकलीवरुन फरारी झाले आहेत. या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत या प्रकरणाच्या तपासात कसलीच प्रगती झाली नव्हती. पैशाची बॅग लांबविणारे भामटे स्थानिक आहेत की बाहेरचे याचा सुगावाही लागला नव्हता. भामटय़ांनी अनिल यांच्यावर पाळत ठेवून हे कृत्य केले असावे असा संशय  आहे.

दुसरी घटना गुरुवारी रात्री 11 वाजता मारुती गल्ली येथे घडली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आपल्या मुलीसह वॉकिंगला गेलेल्या रुपा राहुल मोरे (वय 35, रा. देशपांडे गल्ली) या महिलेच्या गळय़ातील 17.25 ग्रॅमचे मंगळसूत्र व चेन हिसकावून घेऊन पलायन करणाऱया भामटय़ाला पकडून संतप्त जमावाने चोप दिला आहे. सध्या त्याची चौकशी करण्यात येत आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

गुरुवारी रात्री उशीरा अनिल पोरवाल (वय 50) व रुपा मोरे (वय 35) या दोघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या दोन्ही घटना शहरातील मध्यवर्ती भागात घडल्या आहेत. पैशाची बॅग लांबविण्याची घटना केळकरबाग येथील बोळात घडली आहे. काही बोळांमध्ये संशयास्पद व नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे. त्यांना हटकण्याचे प्रयत्नही केले जात नाही. अशा घटनांमुळे नागरिक भयभीत होत आहेत.