|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात पुन्हा हत्ती पकड मोहीम

सिंधुदुर्गात पुन्हा हत्ती पकड मोहीम 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये उच्छाद घालणाऱया हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी माणगाव भागात राबविण्यात आलेल्या हत्ती पकड मोहिमेप्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे येथेही हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी वन खात्याने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश खासदार विनायक राऊत यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकाऱयांना दिले आहेत. तसेच वन्य प्राण्यांपासून शेती, बागायतींचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत भारित कुंपण योजना राबवण्याचे निर्देशही खासदारांनी बैठकीत दिले.

 वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात खासदार राऊत यांनी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीसाठी आमदार वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, वनखात्याचे कोल्हापूर विभागीय मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, विजयराज सुर्वे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, संजय कदम, प्रदीप कोकितकर, जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, कुडाळ सभापती राजन जाधव, जि. प. सदस्य नागेंद्र परब, प्रदीप नारकर, छोटू पारकर, विक्रांत सावंत, बाबा आंगणे, हेवाळे सरपंच संदीप देसाई आदी उपस्थित होते.

 विलवडे येथील शेतकरी प्रकाश दळवी यांच्या केळीच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले. सुमारे 350 केळीच्या झाडांचे गवारेडे आणि वादळामध्ये नुकसान झाले. परंतु नुकसानीचे पंचनामे करताना फक्त 125 केळींचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले, अशी तक्रार करताच खासदारांनी फेरपंचनामा करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यामध्ये यापुढे चूक झाल्यास क्षम्य नाही. कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यापुढे नुकसानीचे पंचनामा झाल्यावर तात्काळ पंचनाम्याची कॉपी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱयाला दिली जाईल. त्यामुळे पंचनाम्यामध्ये त्रुटी राहाणार नाहीत, असे मुख्य वनसंरक्षकांनी स्पष्ट केले. तसेच 48 तासात पंचनामे करण्यासाठी तलाठी व कृषी अधिकाऱयांना सोबत राहाण्यासाठी महसूल विभागाला सूचना देण्यात येतील, असेही खासदारांनी स्पष्ट केले.

हत्ती पकड मोहिमेचा प्रस्ताव करा

दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गावामध्ये सात हत्तींचा कळप धुडगूस घालत असून शेती-बागायतींच्या नुकसानीबरोबरच जनतेला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. त्यामुळे हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी हेवाळे सरपंच संदीप देसाई यांनी केली. यावर चर्चा होऊन सद्यस्थितीत हत्तींना वस्तीमधून जंगलामध्ये पिटाळण्यासाठी वनखात्याची दोन पथके तैनात ठेवण्यात येतील व एक मोबाईल व्हॅनही ठेवण्यात येईल, असे मुख्य वनसंरक्षक पाटील यांनी सांगितले. हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त होण्यासाठी माणगाव खोऱयामध्ये यापूर्वी हत्ती पकड मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच पद्धतीने हेवाळेमध्येही हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा आणि पेंद्र व राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा, असे आदेश खासदार राऊत यांनी दिले.

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विद्युत भारीत कुंपण

 हत्तींव्यतिरिक्त गवारेडे, माकडे, डुक्कर यांच्यापासूनही मोठय़ा प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान होत आहे. शेतकऱयांना त्याची नुकसान भरपाई फार कमी प्रमाणात दिली जाते. हे लक्षात घेऊन शेतकऱयांच्या शेती-बागायतींचे संरक्षण व्हावे, यासाठी मागेल त्या शेतकऱयाला विद्युत भारीत कुंपण योजना राबवण्याचे आदेश खासदारांनी वन विभागाला दिले. ही योजना राबवण्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही दिल्या. जंगलतोड मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे वन्य प्राणी जंगल सोडून वस्तीमध्ये उतरू लागल्याने अवैध जंगलतोड थांबवण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या. हत्तींच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ मदत करण्यात यावी. त्यामध्ये कुणी हयगय करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावा, असे आदेशही खासदारांनी दिले. एकूणच जिल्हय़ातील वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान आणि त्यावरील उपाययोजना यावर अभ्यास करून एक महिन्यात अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान वन्य प्राण्यांपासून होणाऱया नुकसानीची भरपाई फारच कमी प्रमाणात असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे मुख्य वनसंरक्षकांनी यावेळी स्पष्ट केले.

‘केएफडी’साठी दोन टीम

सिंधुदुर्गामध्ये माकडतापाने दोन वर्षांपूर्वी शिरकाव केल्यानंतर दोडामार्ग, सावंतवाडी आणि आता कुडाळ तालुक्यातही माकडपात शिरकाव करू पाहात आहे. या पार्श्वभूमीवर वनखातेही सतर्क असून मृत माकड सापडल्यास त्याची तात्काळ विल्हेवाट लावण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱयांच्या दहाजणांच्या दोन टीम तयार करण्यात आल्याची माहिती अरविंद पाटील यांनी दिली.

Related posts: