|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सीमेवर चार दहशतवाद्यांना कंठस्नान

सीमेवर चार दहशतवाद्यांना कंठस्नान 

सीआरपीएफवरील हल्ला उधळला, मोठा शस्त्रसाठा  जप्त

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्हय़ातील संबल सीमेवर केंद्रीय राखींव पोलिसदलाने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या ठाण्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. पोलिस आणि दहशतवादी यांच्यात दीड तास तुंबळ चकमक उडाली.

चार शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. ठाण्यावर आत्मघाती हल्ला करण्याची त्यांची योजना होती. मात्र ठाण्यापासून काही अंतरावरच त्यांना रोखण्यात आले. त्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलिसांनीही तिखट प्रत्युत्तर दिले. त्यात चारही दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून चार एके 47 रायफल्स, 9 हातबाँब, मॅक्झिन्स आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला. पहाटे साडेचारला सुरू झालेली चकमक सहा वाजता थांबली.

ठाण्याभोवती असणारे तारांचे कुंपण तोडून हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, मजबूत कुंपण लवकर तोडण्यात त्यांना यश आले नाही. गस्तीवरील पोलिसांनी त्वरित त्यांना घेरले आणि काही वेळातच त्यांना ठार करण्यात आले. या कारवाईत एकही पोलिस जखमी झाला नाही.

पाकचे मोठे नुकसान

गेल्या सात दिवसांमध्ये सीमेवर किमान चार हल्ले परतविण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानचे सात सैनिक आणि 18 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारताचे दोन सैनिक हुतात्मा झाले आहेत. पाकच्या आक्रमकतेला भारताकडून त्याहीपेक्षा तीव्र प्रत्युत्तर दिले गेल्याने पाकची मोठी हानी झाली आहे. मात्र, पाकिस्तानने त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अधिकृतरित्या ही जिवीत हानी घोषित केलेली नाही.

डीजीएमओची चर्चा

भारताच्या त्वरित आणि आक्रमक प्रत्युत्तरांमुळे पाकिस्तानला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे. पाक सेनेच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओना दूरध्वनी करून सीमेवर शांतता राखण्यासाठी चर्चा करण्याची विनंती सोमवारी दुपारी 12 वाजता केली. त्यानंतर दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा करण्यात आली. चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असली तरी पाकिस्तानने कोणतीही आगळीक केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती सेनेच्या प्रवक्त्याने केली. तथापि, पाकच्या डीजीएमओकडून चर्चेचा प्रस्ताव आल्याने पाक दबावाखाली असल्याचे स्पष्ट होते, असे तज्ञांनी म्हटले आहे.

Related posts: