|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑनर किलींगच्या घटनेने विजापूर हादरले

ऑनर किलींगच्या घटनेने विजापूर हादरले 

दलित युवकाशी विवाह केल्याने मुस्लीम युवतीला घरच्यांनी जीवंत जाळले

प्रतिनिधी / बेंगळूर

दलित युवकाशी विवाह केल्याच्या कारणावरून गर्भवती असलेल्या मुस्लीम युवतीला तिच्या कुटुंबीयांनी जीवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना विजापूर जिल्हय़ातील गुंडकनाळ येथे घडली आहे. शनिवार दि. 3 जून रोजी घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विजापूर जिल्हय़ात खळबळ उडाली आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील गुंडकनाळ येथील रहिवासी बानू बेगम (वय 21) आणि सायबण्णा शरणप्पा (वय 24)  यांचे परस्परांवर प्रेम होते. मात्र, याविषयीचा सुगावा त्यांनी कुटुंबीयांना लागू दिला नव्हता. जानेवारी त्यांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर मोठय़ा प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता.

23 जानेवारी रोजी दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण झाले होते. सायबण्णा आणि बानू बेगम यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवाय, त्याच दिवशी पोलीस स्थानकात जाऊन बेगमच्या कुटुंबीयांनी सायबण्णाविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 24 जानेवारी रोजी बानू आणि सायबण्णा हे दोघे पळून गेले. ते कोठे आहेत याचा थांगपत्ता कोणाला लागला नाही. गोव्याला गेलेले हे प्रेमी युगुल तेथील रजिस्टर (विवाह नोंदणी कार्यालय) ऑफिसमध्ये विवाहबद्ध झाले. भाडोत्री खोली घेऊन त्यांनी संसार थाटला.

चार महिन्यानंतर बानू गर्भवती झाली. तेव्हा गर्भवती असल्याचे कुटुंबीयांना समजल्यास त्यांचे मनपरिवर्तन होईल, आपल्या विवाहाला दोन्ही कुटुंबीय संमती देतील, अशा समजुतीने ते दोघे आपल्या गावी गुंडकनाळ येथे परतले. मात्र झाले उलट. बानूच्या कुटुंबीयांनी सायबण्णाला सोडून देण्याची ताकिद दिली. मात्र, बानूने नकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार खडाजंगी झाली. किरकोळ हाणामारी झाली. त्या दिवशी सायंकाळी बानूच्या कुटुंबीयांनी सायबण्णाला जबर मारहाण केली. त्यामुळे जखमी अवस्थेत स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी सायबण्णा पोलीस स्थानकाच्या दिशेने पळत सुटला. तिकडे बानूलाही मारहाण करून पेटवून दिले. सायबण्णा पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर 10 मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पूर्णपणे भाजलेली बानू जागीच गतप्राण झाली. तिला आगीतून वाचविण्याच्या प्रयत्नात सायबण्णा भाजल्याने आणखी जखमी झाला, अशी माहिती ताळीकोटचे डीवायएसपी पी. पी. के. पाटील यांनी दिली.

Related posts: