|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना लवादाकडून मजुरीवाढीची घोषणा

खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना लवादाकडून मजुरीवाढीची घोषणा 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

गेल्या दिड वर्षापासून सुरु असणाऱया खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ प्रश्नावर सोमवारी झालेल्या बैठकीवेळी तेडगा निघाला. खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी खर्चीवाल्यांना 52 पिकास 6 पैसे मजुरी देण्याची घोषणा केली. ही लवादची शेवटची बैठक असुन यानंतर या प्रश्नी कोणतीही बैठक घेण्यात येणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. पण हा तोडगा काढताना व्यापाऱयांना कोणतीही विचारणा न करता घेतला गेलेला एकतर्फी निर्णय असून आपण याच्याशी असहमत असल्याचे ट्रेडींग असोशिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेली अनेक वर्षे खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा  मजुरीवाढीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलेला आहे. 2013 साली केलेल्या किमान साडेचार पैसे मजुरीवाढीनंतर आजपर्यंत कोणतीही मजुरीवाढ झाली नसल्याचे कारण देत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी अनेक वेळा आंदोलन केले होते. वाढती महागाई व कामगार पगार यामुळे मेटाकुटीला आलेल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना किमान 6 पैसे मजुरी मिळावी अशी मागणी केली होती. आता शहरात साडेपाच पैसे मजुरी सुरु आहे. त्यामध्ये अर्धा पैसा वाढवून ती सहा पैसे करावी अशी मागणी त्यांची होती.

यावर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पाचवेळा बैठक घेवून खर्चीवाले व व्यापाऱयांची मते जाणून घेतली होती. कापड उद्योगातील मंदी, जीएसटीची अंमलबजावणी या विविध कारणांसाठी या बैठकीतला निर्णय पुढे ढकलला गेला. अखेर मागच्या बैठकीत  5 जुनच्या लवादाच्या बैठकीवेळी सर्वसमावेशक तोडगा काढण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी कार्यालयात बैठक बोलावली होती. यासाठी खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, वस्त्राsद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी आमदार अशोकराव जांभळे, टेडींग असोशिएशनचे उगमचंद गांधी, घनशाम इनामी, विनोद कांकाणी यांच्यासह खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुरेश हाळवणकर यांनी या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मजुरीवाढी संदर्भात निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यापाऱयांच्या वतीने बोलताना अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी ज्यावेळी बाजारात कापडाला मागणी असते त्यावेळी मजुरी वाढवून दिलीच आहे. मजुरीवाढ करण्यासाठी कोणताही कायदा नसून ती प्रथेप्रमाणे व परंपरेप्रमाणे दिली जाते. त्यामुळे हा निर्णय यंत्रमागधारक व व्यापारी यांच्या पातळीवरील असल्याचे  पत्र दिल्याचे सांगितले. तसेच ज्या ज्या वेळी मजुरीवाढीचा निर्णय झाला त्यावेळी शहरातील व्यापार कमी झाल्याचे दिसून आले. या अशा निर्णयामुळे व्यापार संपवायचा आहे काय असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावेळी आमदार हाळवणकर यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही मजुरीवाढ स्विकारावी असे आवाहन केले.

व्यापाऱयांच्या वतीने चंदनमल गांधी यांनी मजुरीवाढीबाबत चर्चा करा पण याचा निर्णय हा व्यापारी व पेढीवाल्यांसह सर्वांना परवडला पाहिजे. व्यापारी जगेल असा निर्णय घ्या असे सांगितले. सुमारे तीन तासाहून अधिक काळ व्यापारी व खर्चीवाले त्यांच्या मुद्दयावर ठाम राहिले. शेवटी खासदार, आमदारांसह सर्वच प्रतिनिधींनी प्रांताधिकाऱयांना याबाबत सर्वाधिकार देवून निर्णय घेण्याची विनंती केली. हा निर्णय सर्वांनी मान्य करावा अशी विनंती केली.

 यानंतर प्रांताधिकाऱयांनी कापड व्यापाऱयांशी स्वतंत्र दालनात बैठक घेतली. त्यानंतर खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधींनाही या बैठकीत बोलावले. सुमारे पंधरा मिनिटाहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर व्यापारी दालनातून बाहेर येवून चर्चा करण्यासाठी बाहेर गेले. यावेळी प्रांताधिकारी शिंगटे यांनी बाहेर येवून  सर्वांची परत बैठक घेतली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी लवादाशी चर्चा झाली आहे. पोलिस व गुप्तचर यंत्रणांकडून गेल्या काही महिन्यात खर्चीवाल्याच्या मजुरीचा अंदाज घेतला असुन तो साडेपाच पैसे इतका आहे. वाढती महागाई व होणारी मजुरीवाढ लक्षात घेता त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी खर्चीवाल्यांना 52 पिकास किमान सहा पैसे मजुरीची घोषणा केली. या मजुरीवाढीची अंमलबजावणी येत्या शुक्रवारी करायची आहे. 

खासदार राजू शेट्टी यांनी हा निर्णय शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेतला आहे. यामागे कोणताही राजकीय लाभाचा मुद्दा नसून शहरातील सर्वसामान्य खर्चीवाला यंत्रमागधारक जगावा यासाठी लवादाने परंपरेनुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे यासंदर्भात लवादाची कोणतीही बैठक होणार नाही सर्वांनी हा निर्णय मान्य करावा असे आवाहन केले.

यावेळी पक्षप्रतोद तानाजी पोवार, सागर चाळके, नगरसेवक युवराज माळी, अधिकारी अनिल गुरव, विजय भोसले, पोलिस उपाधिक्षक विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक सतीश पोवार, तहसिलदार वैशाली राजमाने, विजय भोसले, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.