|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज तालुक्यात कडकडीत बंद

मिरज तालुक्यात कडकडीत बंद 

प्रतिनिधी/ मिरज

शेतकऱयांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला तालुक्याच्या सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळाला. आरग येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत आणि जयाजी सुर्यवंशी यांच्या प्रतिमांचे दहन केले. संपूर्ण तालुक्यात एसटी आणि खासगी वाहतूक बंद होती. तालुक्याच्या कोणत्याच गावातून भाजीपाला व दूध आज विक्रीसाठी बाहेर पडले नाही. मिरज शहरात मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेनेने श्रीकांत चौकात आंदोलन केले.

शेतकऱयांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी आयोजित केलेला महाराष्ट्र बंद तालुक्यात यशस्वी झाला. पूर्व आणि पश्चिम भागात या बंदला शेतकऱयांसह व्यवसा†ियक, व्यापारी, ग्रामस्थ यांनी पाठींबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. तालुक्यातील मालगांव, आरग, बेडग, लिंगनूर, सलगरे, म्हैसाळ, सोनी, भोसे, कळंबी  या गावामध्ये सर्व व्यवहार बंद होते. चौकाचौकात शासनाच्या निषेधाचे फलक लावत संपूर्ण कर्जमुक्तीची आणि अन्य मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

या गावांमधून सोमवारी शहरी भागाकडे जाणारा भाजीपाला, दूध व अन्य साहित्य पाठविण्यात आले नाही. काही गावांमध्ये दूध वाटण्यात आले. तर भाजीपाला न तोडता तसाच शेतात ठेवण्यात आला. गावागावांमध्ये दिवसभर याच बंदची चर्चा होती. ढवळी येथे सरपंच अश्विनी पाटील, महावीर आळते, संजय गौराजे, नरसगौंडा गौराजे, प्रविण गौराजे, सुहास स्वामी, गजानन देशमुख, संजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली बंद पुकारण्यात आला. नरवाडमध्येही दिवसभर सर्व व्यवहार बंद होते. एम.के.माळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.

आरग येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात येऊन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाबद्दल निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, जयाजी सुर्यवंशी यांच्या प्रतिमांचे दहन केले. यावेळी विकास सोसायटी चेअरमन मौला मुजावर, बाबासाहेब पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रशांत चौगुले, राजेंद्र चौगुले, अजित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सलगरे येथे सोमवारी भरणाऱया आठवडा बाजारावरही प†िरणाम झाला.

शहरासह तालुक्यात बंदमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवला. एसटी बसेस आणि खासगी वाहतूक पूर्णतः बंद होती. त्यामुळे दिवसभर नागरिकांची गैरसोय झाली. कर्नाटकातून मिरजेत दवाखान्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. बंदचा परिणाम शहरातील भाजी बाजार आणि दूध पुरवठय़ावरही जाणवला.

शेतकऱयांच्या या बंदला विविध संघटना, पक्ष यांनीही पाठींबा दिला. शिवसेनेच्या वतीने श्रीकांत चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तानाजी सातपूते, पप्पू शिंदे, आनंद रजपूत, नेताजी सुर्यवंशी, अनिल रसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पीआरपीच्या वतीनेही शेतकऱयांच्या बंदला पाठींबा देण्यात आला. शेतकऱयांच्या विविध मागण्या त्वरीत मान्य कराव्यात, या मागणीचे निवेदन जैलाब शेख, रमेश यरनाळे, युनूस चाबुकस्वार, युसूफ शेख, शौकत मुजावर, फिरोज पटेल, मुबारक मोमीन, दस्तगीर शेख, गौस शेख, नासिर मोमीन, तौफीक शेख, शब्बीर मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनीही या बंदला पाठींबा दिला आहे.

तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असला तरी, शहरात मात्र काही ठिकाणी व्यवहार चोरीछुपे सुरू होते. सायंकाळनंतर मात्र वाहतूक आणि दुकाने सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.