|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निवती दीपगृहावरील जुनी दिवाबत्ती पुन्हा होणार प्रकाशमान

निवती दीपगृहावरील जुनी दिवाबत्ती पुन्हा होणार प्रकाशमान 

म्हापण : ब्रिटिशांच्या काळातील पॅरिस बनावटीची निवती दीपगृहावरील जुनी दिवाबत्ती सध्या दीपगृहावरून प्रकाश देत नसली, तरी कन्याकुमारी येथील मुट्टम या तामिळनाडू राज्यातील लाईट हाऊसवर आयोजित जुन्या ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनात डौलात आपला जुना साज धारण करून प्रकाशमान होणार आहे. जपानच्या दीपगृहानंतर जगातील दुसऱया क्रमांकाचे दीपगृह म्हणून निवती (वेंगुर्ले) रॉकवरील निवती दीपगृहाची ओळख आहे. हा दीपगृह निवती येथे भर समुद्रात आहे. या रॉकवर 2008 पर्यंत ही जुनी दिवाबत्ती रॉकेलच्या दिव्याच्या सहाय्याने समुद्रात मच्छीमारांना मार्गदर्शक म्हणून कार्यरत होती.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वेंगुर्ले लाईट हाऊसच्या अखत्यारित निवती दीपगृह येते. निवती समुद्र किनाऱयावरून सुमारे आठ किमी आत समुद्रात मोठे खडक आहे. त्याला निवती (वेंगुर्ले) रॉक म्हणून ओळखले जाते व त्यावर हा दीपगृह उभारण्यात आला आहे. ब्रिटिश काळापासून या खडकावर दिवाबत्तीची सोय आहे.

1870 मध्ये इंग्रजांनी सुरू केले दीपगृह

समुद्रातील या रॉकवर 1870 च्या सुमारास इंग्रजांनी पहिली दिवाबत्तीची सोय केली, असे सांगण्यात येते. भारतात त्यांनी शिडाच्या जहाजांनी येऊन आपल्या देशावर राज्य केले. इंग्रजांना व्यापाऱयासाठी भारतात येणे-जाणे भाग होते. समुदात जहाजांना दिशा दाखविण्यासाठी धोक्याची सूचना देण्यात यावी, यासाठी या बेटावर लाईट हाऊस बांधण्यात आले. इंग्रजांची दूरदृष्टी त्यातून दिसून आली.

सुरुवातीला वनस्पती तेलावर जळणारा दिवा लावला जात असे. 1890 च्या दशकात मनोरा बांधण्यात आला. त्यावर रॉकेलवर चालणारा दिवा लावण्यात आला. हा दिवा (लॅम्प) दुहेरी बाजूने चालणारा ऑप्टिक पद्धतीचा होता, अशी माहिती प्राप्त आहे.

पोर्तुगीज, डच, इंग्रज सत्तेला दीपगृह महत्वाचे असल्याने लाईट हाऊस तज्ञ ऍलम डिस्टिव्हन यांनी 1927 साली या रॉकला भेट दिली. परिसराची त्यांनी पाहणी केली. निवती रॉकवर जास्त क्षमतेचा लॅम्प लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर पॅरिसहून 20 मीटर जाड धातूचा मनोरा, 55 ली. बर्नर, विशिष्ट काचेची दिवाबत्ती व अन्य साहित्य आणले. सुमारे 250 फूट उंचीवर हे साहित्य नेले कसे हे आश्चर्य अद्यापही आहे. पॅरिसहून आणलेल्या साहित्याची उभारणी चान्स ब्रदर्स बर्मिंगहॅम यांनी केली. त्यानंतर लाईट हाऊसच्या देखभालीसाठी जॉन ऑसवर्ड या तज्ञाची नियुक्ती करण्यात आली.

दीपगृहावर केला रेडिओ प्रोजेक्टर कार्यान्वित

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रेडिओ प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आला, तर भारत सरकारचे यावर स्वातंत्र्यानंतर नियंत्रण असून या दिवाबत्तीच्या सोयीसाठी खास कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे कर्मचाऱयांच्या निवासाचीही व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात समुद्र खवळलेला असल्याने या दीपगृहावरील कर्मचाऱयांचा किनाऱयाशी संपर्क नसतो. चार महिन्यांच्या अन्नधान्याची त्यांची व्यवस्था मे महिन्यातच केलेली असते.

2008 पर्यंत पॅरिस बनावटीची दिवाबत्ती सेवेत

निवती दीपगृहावर ब्रिटिशांच्या काळापासून पॅरिस बनावटीची दिवाबत्ती सेवेत होती. या दिवाबत्तीच्या सांगाडय़ात काचेचा वापर केला आहे. या दिवाबत्तीला व्हिल असून त्यावरून दिवाबत्ती फिरत असते. व्हिलभोवती तांब्याच्या धातूच्या सांगाडय़ात विविध आकाराच्या काचा बसविल्या आहेत. एक, दोन, चार फुटांसह मोठय़ा व जाड, दीड मीटर लांबीच्या काचांचा वापर करण्यात आला. सुमारे 120 काचांचा वापर केलेला होता. या दिवाबत्तीच्या आत साधारण एक फूट उंचीचा एक रॉकेलवर चालणारा दिवा पेटवून ठेवला जात असे. असे दोन दिवे होते. त्यांच्या साईडला गोल मोठी दोन भिंगे बसविण्यात आली होती. खिडकीसारखे चार रिफ्लेक्टर होते. त्यांच्या माध्यमातून रॉकेलच्या दिव्याचा प्रकाश खूप दूरवर व स्पष्ट दिसेल, असा पडत होता. रांगणागड, करुळघाट, मनसंतोषगड ते थेट फुकेरी कडय़ावर हा प्रकाश दिसत होता. साधारण 80 ते 90 किमी लांब या प्रकाशाची रेंज होती. ही किमया उच्च प्रतीची भिंगे व रिप्लेक्टर काचेमुळे साधली जात होती.

खर्च परवडत नसल्याने नवी दिवाबत्ती सोलरवर

जुनी दिवाबत्ती खर्च परवडत नाही. रॉकेल उपलब्ध होत नाही, अशी कारणे देऊन निवती दीपगृहावरील जुनी दिवाबत्ती बंद करण्यात आली. त्याजागी सोलरवर चालणारी नवीन दिवाबत्ती या दीपगृहावर बसविण्यात आली. या नव्या दिवाबत्तीचा प्रकाश दूरवर सोडा, नीट किनाऱयावरही पोहोचत नाही. एवढी ती कमकुवत आहे.

जुनी दिवाबत्ती नीटनेटकी ठेवली होती

जुन्या दिवाबत्तीची प्रेम काचेसह काढून वेंगुर्ले लाईट हाऊस व्यवस्थापनाने निवती दीपगृहावरील एका खोलीत व्यवस्थित ठेवली होती. सांगाडय़ासह काच सामान, दोन दिवे, भिंग नीटनेटके ठेवून ऐतिहासिक वस्तूंचे जतन केले आहे.

प्रदर्शनात मांडण्यासाठी दिवाबत्ती हलविण्याची सूचना

निवती दीपगृहावर 2008 मध्ये काढून ठेवण्यात आलेली जुनी दिवाबत्ती सर्व भिंग, दोन दिवे रिफ्लेक्टर सांगाडय़ासह कन्याकुमारी येथे प्रदर्शनात मांडायची आहे. त्यामुळे निवती दीपगृहावरून ती सुरक्षितरित्या हलविण्याचे आदेश डायरेक्टर जनरल डिपार्टमेंट लाईट हाऊसेस व लाईट शिप्स (नवी दिल्ली) यांनी वेंगुर्ले लाईट हाऊसच्या अधिकाऱयांना दिले व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली.

दिवाबत्ती साहित्य किनाऱयावर आणले

वेंगुर्ले लाईट हाऊसच्या अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली निवती दीपगृहावरील जुन्या दिवाबत्तीचे सर्व साहित्य तेथील पंधरा मच्छीमारांनी उधाण सुरू असतानाही 19 व 20 मे रोजी दोन बोटींच्या सहाय्याने किनाऱयावर सुरक्षित आणले. काचसामान दीपगृहावरून बोटीत उतरविणे मोठे आव्हान मच्छीमारांनी पेलून यशस्वी केले. साहित्य सुखरुप कन्याकुमारीला नेण्यासाठी निवतीत पॅकिंग करण्यात आले.

मुट्टम लाईट हाऊसवर प्रदर्शन

तामिळनाडू राज्यातील चेन्नई-कन्याकुमारानजीक मुट्टम लाईट हाऊसवर देशातील दीपगृहांवरील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन जुलैमध्ये भरणार आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच निवती येथून एका खास वाहनाने ती जुनी दिवाबत्ती मुट्टम लाईट हाऊसवर नेऊन तेथील अधिकाऱयांकडे सुपुर्द करण्यात आलीय. भटकळ येथील एक जुना दिवा व ब्रिटिशांच्या काळातील बावटाही तेथे नेण्यात आला आहे. मद्रास व अन्य दीपगृहांवरूनही ऐतिहासिक महत्व असलेल्या वस्तू प्रदर्शनासाठी आणण्यात येणार आहेत.

मुट्टम लाईट हाऊस युद्धपातळीवर तयारी

वेंगुर्ले लाईट हाऊस ज्या पद्धतीने डोंगरावर आहे. तसेच लाईट हाऊस ‘मुट्टम’ (तामिळनाडू) येथे आहे. प्रदर्शनाची जय्यत तयारी तेथे सुरू आहे. ऐतिहासिक वस्तू मांडण्यासाठी जागांचे बांधकामही सुरू आहे.

व्ही. रमण दिवाबत्तीची जोडणी करणार

तीस वर्षांपूर्वी निवती दीपगृहावर व्ही. रमण हे कर्मचारी कार्यरत होते. 2008 मध्ये त्यांनीच ही जुनी दिवाबत्ती सर्व साहित्यासह काढून सुरक्षित ठेवली होती. दिवाबत्तीची मांडणी कशी होती, याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. अजूनही ते सेवेत असून ते मुट्टम लाईट हाऊसवर येऊन निवती दीपगृहावरील त्या जुन्या लाईट हाऊसची जोडणी करून प्रदर्शनात तेच मांडणी करणार आहेत.

दीपगृहाजवळचा परिसर पर्यटनास चालना देणारा

दीपगृहाजवळचा परिसर मनाला भुरळ पाडणारा आहे. निळय़ाशार पाण्यात उभे असलेले खडक नयनरम्य वाटतात. सुमारे 250 फूट उंच सरळ रेषेतील कडा मनाला भुरळ घालतो. लांबवर पाण्यात पसरलेला खडक व त्यावर केलेले बांधकाम तसेच चारही बाजूला पाहिल्यानंतर निसर्गाचे होणारे दर्शन पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. शासनाने हे आयलंड पर्यटकांसाठी खुले केल्यास निश्चितच पर्यटनास चालना मिळेल.