|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कमी अंतरासाठी शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटदरात घट

कमी अंतरासाठी शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकिटदरात घट 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबित आहे. यानुसार आता सुपरफास्ट शताब्दी एक्स्प्रेसच्या कमी अंतराच्या प्रवासाचे भाडे कमी केले जाणार आहे. कमी अंतरासाठीच्या प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय सोडून रस्तेमार्गाचा वापर करू नये यासाठी रेल्वे हे पाऊल उचलत आहे. भारतीय रेल्वेने हा निर्णय अशाच दोन रेल्वेगाडय़ांमध्ये या प्रयोगाच्या यशानंतर घेतला आहे. दोन्ही रेल्वेंमध्ये कमी अंतराच्या प्रवासासाठी भाडेकपात केल्याने रेल्वे विभागाला मोठा नफा झाला आहे. शताब्दी एक्स्प्रेसच्या मार्गावर असणाऱया स्थानकांवर जेथे ती थांबत नाही अशा ठिकाणी प्रवाशांची ये-जा अत्यंत कमी असते असे आढळून आले आहे. अशा ठिकाणी लोक रेल्वेऐवजी एसी बसमधून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. एक्स्प्रेसच्या मार्गावरील या स्थानकांसाठी बसचे कमी प्रवासभाडे प्रवाशांना आकर्षित करते.

एसी बसेस 430 रुपयाच्या आसपास भाडे आकारतात, तर शताब्दीचे तिकीट 470 रुपयांच्या नजीक आहे. यामुळे छोटय़ा अंतरासाठी फक्त 30 टक्के प्रवासीच रेल्वेची निवड करतात. यामुळे रेल्वे विभागाने प्रवासभाडे कमी करत 350 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जवळपास 100 टक्के प्रवासी रेल्वेने प्रवास करू लागल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी म्हटले.

अजमेर आणि जयपूरदरम्यान तसेच चेन्नई आणि बेंगळूरदरम्यानच्या दोन स्थानकांसाठी एसी बसचे भाडे 430 रुपये तर शताब्दीचे 470 रुपये असल्याचे आढळले. यासाठी शताब्दीच्या तिकिटदरात कपात केली आणि याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जमशेद यांनी सांगितले. रेल्वे सोडून रस्तेमार्गाचा अवलंब करण्याची वाढती वृत्ती भारतीय रेल्वेसाठी चिंतेचे एक मोठे कारण आहे. 1981 पासून मालवाहतुकीत रेल्वेची हिस्सेदारी 62 टक्क्यांवरून कमी होत 36 टक्क्यांवर आली आहे.

Related posts: