|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सागरी महामार्गावरील परुळेतील पूल धोकादायक

सागरी महामार्गावरील परुळेतील पूल धोकादायक 

कुडाळ  : वेंगुर्ले तालुक्यातील परुळेतून जाणाऱया सागरी महामार्गावरील देव आदिनारायण मंदिरनजीक असलेले जुनाट पूल पूर्णपणे धोकादायक झाले आहे. या पुलाला खालच्या बाजूने भेगा गेल्या आहेत. हे पूल वाहतूक योग्य नाही. त्यामुळे केव्हाही पूल कोसळून मोठी हानी होऊ शकते. या पुलाची तपासणी करून पूल वाहतुकीस योग्य असल्याचा दाखला शासनाने देऊन पूल कोसळणार नाही, याची हमी द्यावी, अशी मागणी परुळे पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ केव्हाही महामार्ग बंद करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

या सागरी महामार्गावरून रोज सुमारे 500 पेक्षा जास्त वाळूचे डंपर व शेकडो वाहने जा-ये करतात. डंपरची वाहतूक तसेच विमानतळाच्या कामासाठी येणारी मोठी वाहने याच रस्त्याने येतात. ही वाहने अवजड असल्याने व त्या क्षमतेचा हा रस्ता नसल्याने रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. या डंपरमुळे महामार्गाची साईडपट्टी खचली असून पादचाऱयांनाही त्याचा त्रास होत आहे. डंपर अतिवेगाने व एकामागून एक अशी वाहतूक रोज सुरू असल्यामुळे अन्य सर्व छोटय़ा वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. या महामार्गावर परुळे हायस्कूल व अन्य प्राथमिक शाळा आहेत. त्या मुलांच्या जीवितासही डंपर वाहतुकीचा धोका आहे. डंपर वाहतुकीवर पूर्णपणे नियंत्रण आणावे, अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

महामार्गावर आदिनारायण मंदिरनजीक असलेले पूल जूनाट असून अरुंद आहे. पुलाची आत्ताची स्थिती धोकादायक आहे. अशा पुलावरून रेतीने भरलेले डंपर वाहतूक करीत आहेत. त्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पावसात केव्हाही पूल कोसळून अपघाताची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पूल कोसळून अपघात होण्याची वाट पाहण्याआधी या पुलावरून होणारी वाहतूक बंद करावी अन्यथा पूल वाहतुकीस योग्य असल्याची हमी ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आठ दिवसांत या पुलासंदर्भात समाधानकारक निर्णय न मिळाल्यास ग्रामस्थ केव्हाही महामार्ग बंद आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या भागातील लोकांनी ज्यांच्या हाती लोकप्रतिनिधींची सुत्रे दिली आहेत, ते सगळे लोकप्रतिनिधी वाळूशी संबंधित असल्याने त्यांच्याकडूनही या डंपर वाहतुकीबाबत व या धोकादायक पुलाबाबत कोणताही प्रयत्न होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.