|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबा बागायतदारही कर्जबाजारी

आंबा बागायतदारही कर्जबाजारी 

देवगड : देवगड तालुक्यातील आंबा बागायदार मोठय़ा प्रमाणात कर्जबाजारी आहेत. आंबा हंगामातील उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जमविताना आंबा बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच बँकांची कर्जे असल्याने बँकांचा तगादा बागायतदारांना सुरू असल्याने आंबा बागायतदारही आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱयांप्रमाणेच आंबा बागायतदारही कर्जबाजारी असून शासनाने आंबा बागायतदारांचीही कर्जे माफ करावीत. यासाठी शिवसेना आंबा बागायतदारांच्या पाठिशी आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेच्यावतीने राज्यातील शेतकऱयांच्या संपाला पाठिंबा दिला असल्याने मुख्यमंत्र्यांना शेतकऱयांची खरी परिस्थिती समजावी यासाठी शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्ज मुक्त होणारच!’ या आशयाखाली शेतकऱयांचे अर्ज भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱयांचे हे अर्ज मुख्यमंत्रांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. यासंदर्भात देवगड तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार, शेतकरी यांचे अर्ज शिवसेनच्यावतीने भरून घेण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम, दिनेश पारकर, संतोष तारी, निनाद देशपांडे, प्रसाद दुखंडे आदी उपस्थित होते.

ऍड. करंदीकर म्हणाले, आंबा बागायतदारही मोठय़ा प्रमाणात कर्जबाजारी आहेत. शासनाला बँकाकडूनच याची माहिती मिळू शकते. यावर्षी आंबा उत्पादन जरी चांगले आले असले तरी आंब्याला दर मिळालेला नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांना घेतलेली आंबापीक कर्जे फेडता आलेली नाहीत. त्यामुळे आता बँकाचा तगादाही बागायतदारांना सुरू झाला आहे. विदर्भातील शेतकऱयांप्रमाणे कोकणातील शेतकऱयांनाही आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणू नये, असे ऍड. करंदीकर यांनी सांगितले.