|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा बँक नोकर भरतीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

जिल्हा बँक नोकर भरतीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती प्रक्रिया संपूर्ण रद्द करण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याची माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सातारा जिल्हा बँकेच्या नोकर भरती विरोधात घेतलेल्या आक्षेपाविरोधात उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. नाबार्डच्या स्टेट लेवल टास्क फोर्स कमिटीमार्फत कनिष्ठ लेखक व कनिष्ट शिपाई पदांची सरळसेवा भरती पद्धतीने भरती करण्यास न्यायालयाने बँकेला मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे नोकर भरती करणाऱया शासकीय पॅनेलवरील संस्थांपैकी एका संस्थेकडून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई पदाची लेखी परीक्षा 30 एप्रिल 2017 रोजी घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या तोंडी मुलाखतीकरता संबंधित उमेदवारांना ऑनलाईन मुलाखतपत्र पाठवली होती. त्यानुसार दि. 4 ते 7 जून या दरम्यान शिवाजी सर्कल पोवई नाका सातारा येथील बँकेच्या जुन्या इमारतीत उमेदवारांच्या मुलाखती सुरळीत व विनातक्रार पार पडल्या आहेत. नोकर भरतीसंदर्भात उमेदवारांनी संगणकावर फार्म भरण्यापासून ते मुलाखतीपर्यतची सर्व कार्यवाही बँकेने नियुक्ती केलेल्या एजन्सीमार्फत सुरळीत व पारदर्शकपणे पार पडली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारी बँकींग क्षेत्रात एक नावाजलेली बँक असून काही लोक व जिह्यातील काही लोकप्रतिनिधी बँकेस बदनाम करण्याकरता विविध प्रकारची कारस्थाने रचत आहेत.व कोर्टात धाव घेवून बँकेच्या कामकाजात विघ्न येईल अशा पद्धतीने वागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोकर भरती प्रक्रिया संपूर्ण रद्द करण्याबाबत विकास बोराटे व अन्य दोन यांनी दि. 5 जून रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत 7 रोजी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. बँकेच्यावतीने कायदेशीर सल्लागार ऍड.वाय.एस.जहागिरदार, ऍड.दिलीप बोडके यांनी युक्तीवाद केला.त्यांनी बँकेची बाजू भक्कमपणे मांडली.त्यामुळे न्यायालयाने भरती प्रक्रिया योग्यच असल्याचे सांगितले.