|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वे दरोडय़ातील आरोपींना सक्तमजुरी

रेल्वे दरोडय़ातील आरोपींना सक्तमजुरी 

सुमारे सव्वा वर्षापुर्वीची घटना

केरळमधील सोनाराचे 80 लाख लुटले

पोलीस असल्याचे भासवून केली लूट

आरोपी मुळ साताऱयातील

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याचे भासवत केरळच्या व्यापाऱयाला तब्बल 80 लाखांना लुटणाऱया आरोपींना 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सुमारे सव्वा वर्षापुर्वी घडलेल्या या दरोडाप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांनी ही शिक्षा सुनावली. यातील चार आरेपी सातारा जिल्हय़ातील असून त्यापैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

अमित शिवाजी शिबे (22, रा. नेरूळ नवी मुंबई, मूळ रा. शिबेवाडी, पाटण, जि. सातारा), मच्छिंद्र मारूती कामथे (30, मानपाडा, डोंबिवली पूर्व, मूळ रा. पुरंदर, ठाणे), अनिल राजाराम वंडूसकर (30, कोपरखैरणे, ठाणे, मूळ रा. सातारा), सुदर्शन अशोक भोसले (24, नवी मुंबई, मूळ रा. सातारा), प्रकाश उत्तम लोहार (32, पाटण, सातारा) अशा पाच जणांविरूद्ध आरोप ठेवण्यात आला होता. यातील प्रकाश लोहार हा यापुर्वीच मोटार अपघातात मृत झालेला आहे.

केरळ येथील सोने व्यापारी जितेंद्र हिंदूराव पवार व बाबासाहेब विठ्ठल सरगर यांचे कामगार श्रीराम शेडगे, विकास शिंदे (दोघे रा. मुंबई) यांनी मुंबई येथे सोने विक्री केली. या व्यवहारापोटी मिळालेले 80 लाख रूपये घेऊन ते 22 मार्च 2016 रोजी ओखा एर्नाकुलम गाडीने प्रवास करीत होते. पहाटे 3.30 वा. सुमारास दोन अज्ञात व्यक्ती रेल्वे डब्यामध्ये गेले. त्यांनी शेडगे व शिंदे यांना आपण पोलीस असल्याचे सांगितले. जनरल डब्याचे तिकीट असताना आरक्षित डब्यात का बसलात अशी विचारणा करत साहेबांकडे चला, असे सांगून रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणले. त्यानंतर या दोघांना मुख्य रस्त्यावर आणून अगोदरच उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये बसवले. त्यानंतर काही अंतरावर नेऊन धाक दाखवून त्यांच्याकडील 80 लाख रूपये घेऊन ते पसार झाले. याबाबत शिंदे व शेंडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भादंवि 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी रत्नागिरी पोलीसांनी तपास गतीमान करत आठवडाभरातच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 74 लाख 62 हजार 500 रोख रक्कम व स्विफ्ट कार जप्त केली होती. आरोपींविरूद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. विनय गांधी यांनी काम पाहिले. सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे 35 साक्षीदार तपासण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस एल पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, मामा कदम, जमीर पटेल, सुभाष माने, दिनेश आखाडे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, उदय वाझे, रमीज शेख, प्रविण बर्गे, संदीप मालप, नितीन डोमणे यांनी केला.

दरोडय़ाचा सर्वात मोठा आर्थिक गुन्हा शाबित – ऍड. विनय गांधी

सुमारे दीड वर्षापुर्वी रेल्वेत ही घटना घडली होती. हा दरोडय़ाच सर्वात मोठा शाबित झालेला आर्थिक गुन्हा आहे, अशी माहिती या प्रकरणात सरकारी बाजू मांडणारे ऍड. विनय गांधी यांनी दिली आहे.