|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पश्चिम बंगालमध्ये ‘भाषा आंदोलन’ भडकले

पश्चिम बंगालमध्ये ‘भाषा आंदोलन’ भडकले 

बंगाली सक्तीला गोरखा जनमुक्ती मोर्चाचा विरोध : लष्कराच्या तुकडय़ा तैनात : आंदोलनाला हिंसक वळण

वृत्तसंस्था/ दार्जिलिंग

पश्चिम बंगालमध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. बंगाली भाषासक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या ‘जीजेएम’च्या समर्थकांनी दार्जिलिंग आणि शेजारच्या जिल्हय़ांमध्ये हिंसाचाराचे थैमान घातले आहे. त्यांनी सरकारी वाहने आणि मालमत्तेला लक्ष्य केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सरकारी शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा सक्तीची केल्यानंतर राज्याच्या डोंगरी भागातून विरोध वाढू लागला आहे. गुरूवारपासून दार्जिलिंगसह डोंगरी भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने लष्कराच्या 8 तुकडय़ा तैनात केल्या आहेत. दार्जिलिंगमध्ये 3, कलिंगपाँगमध्ये चार आणि कुर्सियोंगमध्ये एका तुकडीने संचलन केले आहे. याशिवाय त्यांच्या मदतीला स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

गेल्या दोन दिवसात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत अनेक वाहनांना आगी लावल्या. त्यानंतर पोलिसांना आंदोलकांना रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला. जीजेएमचे नेते बिमल गुरंग यांनी राजभवनपर्यंत मार्चचे आवाहन केल्यानंतर ही हिंसा भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी राजभवनमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. आंदोलकांनी राजभवनासमोरील बॅरिकेड्स तोडण्याचा तसेच पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक वाहनांना आगी लावल्या. यामध्ये एका अधिकाऱयासह दोन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

आंदोलनाचे कारण अयोग्य : मुख्यमंत्री ममता बनर्जी

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कारणावरून संप, आंदोलन करणे चुकीचे आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून शांतता भंग करत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. डोंगराळ भागातील परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची दडपशाही सुरू
आहे : बिमल गुरांग

जीजेएमचे सर्वेसर्वा बिमल गुरांग यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्या ताकद दाखवू पहात आहेत. परंतु मीही जीटीएचा निवडून आलेला सदस्य आहे. आणि या डोंगराळ भागात मीच मुख्यमंत्री आहे. दडपशाहीने कोणताही निर्णय मान्य करणार नाही. याबाबत आपण केंद्र सरकारशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. तर डाव्या पक्षांनी याप्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली
आहे.

Related posts: