|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भ्रष्टाचाऱयांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप प्रवेश

भ्रष्टाचाऱयांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप प्रवेश 

वार्ताहर/ निपाणी

 बेनाडी येथील काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्यांनी आम्हा ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्षा व तीन सदस्यांवर जे आरोप केले आहेत ते पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे आहेत. आम्ही भाजप प्रवेश केला तो फक्त गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भ्रष्टाचाऱयांना पद व सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असा खुलासा ग्रा. पं. अध्यक्षा दिव्या सांगावे व उपाध्यक्षा साधना माळगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

 प्रसिद्धी पत्रकात अध्यक्षा व उपाध्यक्षांनी म्हटले आहे की, आम्ही गेली 20 वर्षे झाली काँग्रेस पक्षासोबत राहून गावच्या विकासात हातभार लावला आहे. पदाचा 20 महिन्यांचा कार्यकाळ होताच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी चिकोडी प्रांताधिकारी कार्यालयात गेलो होतो. पण त्यावेळी प्रांताधिकारी नसल्याने राजीनामा न देता परतावे लागले. यानंतर बाजार मिटींग बोलवण्यात आली होती. ही मिटींग कोरमविना होऊ द्यायची नाही म्हणून अशोक कामगोंडा व अशोक क्षीरसागर यांनी कार्यालयासमोर असणाऱया दुकानात 13 सदस्यांसह ठाण मांडले. त्यामुळे मिटींग होऊ शकली नाही.

 या रद्द झालेल्या मिटींगनंतर काँग्रेस सदस्यांनी पुन्हा मिटींग बोलविली. यावेळी आम्ही तीनही सदस्यांसह मिटींगला हजर राहिलो. त्यांनी मात्र स्वतः मिटींग बोलवून हजर न राहण्याचा निर्णय घेतला. 20 महिन्याच्या कालावधीतही असा प्रकार अनेकदा घडला आहे. आम्हा पाचही जणांना ते कधीही काँग्रेसचे समजत नव्हते. तरीही आम्ही सर्व काही सांभाळून घेऊन पारदर्शी कारभार केला आहे. स्वतः भ्रष्टाचार केला नाही व दुसऱयांनाही करू दिला नाही. भ्रष्टाचाऱयांच्या हातात अध्यक्षपद न देण्यासाठी राजीनामा देण्यास नकार दिला. यानंतर तीन सदस्य व आम्ही भाजपा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गावचा विकास होणार हे निश्चित आहे.

 आमच्याकडे राजीनामा मागणारे सुरज पाटील कोण? आमच्या प्रभागातील मतदारांना विचारूनच आम्ही भाजपा प्रवेश केला आहे. काँग्रेस म्हणणाऱया सुरज पाटलांनी आमचा प्रचार केला आहे काय? राजीनामा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही. चेअरमन असणाऱया सोसायटीत नॉमिनेशन कोणाला दिलय ते बघा. मग काँग्रेसची निष्ठा सांगा, असे पत्रकात म्हटले आहे.

राजीनामा मागण्याचा अधिकार शासनाला

आम्ही पक्षांतर केले याला आरोप करणारेच जबाबदार आहेत. 13 सदस्यांपैकी 8 सदस्य लवकरच भाजपा प्रवेश करणार आहेत. या स्थितीलाही अशोक कामगोंडा व अशोक क्षीरसागर जबाबदार राहणार आहेत. आम्ही आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत विकासातून बेनाडीचा कायपालट करणार आहे. आम्ही राजीनामा देणार नाही. तुम्ही ते विचारुही शकत नाही. हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन विचारा. आमचेकडे राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त शासनाला आहे, असे म्हटले आहे.