|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमाफीसाठी उद्या जिल्हाधिकारी, तहसीलवर धरणे

कर्जमाफीसाठी उद्या जिल्हाधिकारी, तहसीलवर धरणे 

प्रतिनिधी/ सांगली

शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यासाठी शेतकरी संपाचा पुढील टप्पा म्हणून सोमवार, 12 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि मंगळवारी 13 जूनला महामार्ग रोको तसेच मिरज जंक्शन येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे व किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिली.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी विकास आघाडी, हमाल पंचायत, जनता दल, शेकाप, शिवसेना, मनसे, भाकप, आवामी विकास पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, सुधार समितीसह सर्व घटक पक्ष ,सामाजिक संघटना, कामगार संघटना, कष्टकरी, हमाल, साखर कामगार आदी सहभागी होणार आहेत.

शेतकऱयांना कर्जमाफी देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.शेतकऱयांना पेन्शन लागू करावी. शेतकऱयांच्या उत्पादित मालाला हमीभाव देण्यात यावा. यासह अन्य मागण्यासाठी जिल्हयात टाळे ठोको, शहर बंद, दूध बंद ,रास्ता रोकोसह अन्य आंदोलने करण्यात आली.

नाशिक येथे झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हयातील सर्व दहाही तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबरच मिरज येथे रेल रोको आंदोलन तसेच महामार्ग रोखण्यात येणार आहे.

मिरज- पंढरपूर, सांगली- इस्लामपूर, कोल्हापूर, कराड, आदी महामार्ग रोखण्यात येणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूनी शेतीच्या कामातून सवड काढून या आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन जेवढे तीव्र होईल. तेवढे सरकार लवकर गुडघे टेकेल. आणि कर्जमाफी देईल. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन खराडे व देशमुख यांनी केले आहे.