|Thursday, May 24, 2018
You are here: Home » मनोरंजन » ललित-नेहाची अनोखी केमिस्ट्री

ललित-नेहाची अनोखी केमिस्ट्री 

जबरदस्त पॅनफॉलोइंग असलेला तसेच लाखो तरुणींची धडकन असलेला ललित प्रभाकर लवकरच मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून आदित्य या नावाने ललित घराघरात पोहोचला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कबीरच्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नेहा महाजन या गुणी अभिनेत्रीनेसुद्धा वेगवेगळय़ा भूमिकेतून, वेगवेगळय़ा भाषेचे सिनेमे करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या 16 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैशाली एंटरटेनमेंट या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या टीटीएमएम या सिनेमात या दोघांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. कुलदीप जाधव या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तेजपाल वाघ यांनी सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद लिहिले आहेत. पंकज पडघन या सुप्रसिद्ध संगीतकाराने सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. मयुर हरदास यांनी  सिनेमॅटोग्राफी, संकलन तसेच क्रिएटीव्ह प्रोडय़ुसरची जबाबदारी सांभाळली आहे. तर नीरज वळसंगकर आणि प्रतिक जोशी हे सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर आहेत. गौरव व तेजस गोगावले यांनी सिनेमाचे कलादिग्दर्शन केले आहे. तसेच हेतल चौधरी यांनी वेशभूषा केली आहे.

ललित-नेहा यांच्यासह विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतिश पुळेकर, सीमा देशमुख, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पुष्कराज चिरपुटकर, पुष्कर लोणारकर, शर्वरी लोहकरे यांचा अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुरू ठाकुर, क्षितिज पटवर्धन, ओमकार दत्त यांची बहारदार गीते असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. टीटीएमएम याचा आपल्या रोजच्या आयुष्यातला अर्थ पटकन लक्षात येतो. मात्र, याच टीटीएमएमच्या काही वेगळय़ा छटा पण आपल्या आयुष्यात असतात याचा अनुभव हा सिनेमा देईल हे नक्की असे दिग्दर्शक कुलदीप जाधव यांनी सांगितले.

Related posts: