|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उमदीत स्टोव्हच्या भडक्यात युवती ठार

उमदीत स्टोव्हच्या भडक्यात युवती ठार 

प्रतिनिधी/ जत

जत तालुक्यातील उमदी येथील शुभांगी पांडुरंग कोडग (18) या युवतीचा स्टोव्हच्या भडक्याने गंभीर भाजून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पहिल्यांदा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची चर्चा जोरात उठली होती. परंतु तसा कोणताच प्रकार झाला नसल्याचे उमदी पोलीसांनी सांगितले. या अपघाताची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे.

अधिक माहीती अशी, तालुकयातील उमदी येथे मलकारसिध्द मंदिरालगत राजू कोडग या सराफ व्यावसायिकाचे घर आहे. या घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात. कोडग यांचे एकत्र कुटुंब आहे. रविवारी तिच्या घरातील लोक कपडे आणण्यासाठी चडचण येथे गेले होते. यावेळी घरी मयत शुभांगी, तिची आजी व दोन लहान मुले होते.

दुपारी लहान मुलांना खाऊ करण्यासाठी तिने स्टोव्ह पेटवला. यावेळी अचानक स्टोव्हचा भडका उडाल्याने यात शुभांगी गंभीर भाजली होती. तर तिची आजी, लहान मुले घराबाहेर कटय़ावर बसले होते. शुभांगी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचे समजताच आजूबाजुचे लोक गोळा झाले. त्यांनी तातडीने उमदीतील आरोग्य केंद्रात तिला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु ती शंभर टक्के भाजल्याने तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर उमदीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची चर्चा उठली. परंतु तसा कोणताच प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर मयत शुभांगी हिचे लग्न ठरले होते. याच महिन्यात तिचे लग्न होणार असल्याची गावकऱयात चर्चा होती. या घटनेने उमदीत हळहळ व्यकत होत आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. तपास उमदी पोलीस करीत आहेत.