|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मेंडला बसवर वटवृक्ष कोसळला

मेंडला बसवर वटवृक्ष कोसळला 

देवगड / कुडाळ  : विजयदुर्ग आगाराच्या विजयदुर्ग-कणकवली एस. टी. बसवर मेंड स्मशानभूमीनजीक जीर्ण वटवृक्ष कोसळल्याने हाहाकार उडाला. केवळ नि केवळ सुदैवाने बसमधील कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये दहा प्रवासी होते. मोंड-बापर्डे मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प होती. तर कुडाळ-भैरववाडी येथील मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास आंब्याचे मोठे झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दिवसभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजयदुर्ग आगारातून सकाळी 5.45 वा. विजयदुर्ग वाडा-मेंड-बापर्डे मार्गे कणकवली ही बसफेरी घेऊन चालक डी. ए. वालावलकर व वाहक एम. जे. तडवी जात होते. ही बस सकाळी सातच्या सुमारास मोंड स्मशानभूमीनजीक आली असता चालत्या एसटीच्या मध्यावरच रस्त्याच्या कडेला असलेला भलामोठा जीर्ण वटवृक्ष कोसळला. वटवृक्ष कोसळल्याने बसमधील प्रवाशांनी घाबरून तातडीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बसवर वड कोसळल्याने मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र एस. टी. मधील एस. टी. चालक, वाहकासह सर्व दहाही प्रवासी सुखरुप असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

एस. टी. च्या कॅरिअरमुळे अनर्थ टळला

चालत्या बसवरील कॅरिअरवर हा वटवृक्ष कोसळल्यामुळे वटवृक्षाचा सर्वभार त्या कॅरिअरवर पडला. त्यामुळे बसवर वेगाने आघात झाला नाही. वटवृक्ष मोठा असल्याने जर बसवरच कोसळला असता तर मोठा आघात झाला असता. सुदैवाने कॅरिअरमुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती चालक व वाहक यांनी विजयदुर्ग आगार व पोलिसांना दिली. त्यानंतर आगार व्यवस्थापक एन. व्ही. बोदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अमृत सावंत, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिवगण, जि. प. सदस्य गणेश राणे, उपसभापती संजय देवरुखकर, राष्ट्रवादीचे युवा नेते अभय बापट आदींनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम विभाग, एस. टी. कर्मचारी व मोंड ग्रामस्थांच्या सहकार्याने एस. टी. बसवरील वटवृक्षाचे झाड हटविण्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नाने वडाचे झाड हटविण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक हसबनीस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

20 वर्षांपूर्वीच्या घटनेच्या आठवणी ताज्या!

देवगड-नांदगाव महामार्गावर शिरगाव आंबेखोल येथे चालत्या एस. टी. बसवर 20 वर्षापूर्वी वटवृक्ष कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार ते पाचजण जागीच ठार झाले होते, तर अनेक प्रवासी जखमी झाले होते. एस. टी. महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या परिवर्तन बसला तो अपघात झाला होता. त्यावेळी बचाव यंत्रणा सक्षम नसल्याने गंभीर जखमी प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. अशाच प्रकारे वटवृक्ष मोंड येथील अपघातात बसवर कोसळले. मात्र, सुदैवाने मोठी हानी टळली. बसचे अपघातात दहा हजाराचे नुकसान झाले.

कुडाळला दिवसभर वाहतूक ठप्प

कुडाळ ः शहरातील भैरववाडी येथील मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास आंब्याचे मोठे झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दिवसभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. विद्युत खांब निकामी झाला, विद्युत वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या. रविवारी मध्यरात्री येथील भैरव मंदिरनजीक शहरातील राज्यमार्ग या मुख्य रस्त्यावर आंब्याचे मोठे झाड कोसळले. ते झाड 11 केव्ही विद्युत वाहिन्यांवर पडून त्या तुटून रस्त्यावर पडल्या, तर एक खांब निकामी झाला. दोन वीज खांब वाकले. वीज वितरणचे नुकसान झाले.

वाहतूक दिवसभर ठप्प

सतत वर्दळीचा हा राज्यमार्ग आहे. झाड पडल्याने दिवसभर वाहतूक ठप्प झाली. त्या मार्गावरील वाहने संत राऊळ महाराज महाविद्यालय मार्गे मुंबई-गोवा महामार्गाने वळविण्यात आली. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना माघारी फिरून पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागली. वीज खांब बदलण्याचे काम सुरू असून झाड विलंबाने बाजूला करण्यात आले. झाड बाजूला करण्यासाठी तेथील मेस्त्राr व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले. शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कर्मचाऱयांमार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

माळगाव येथे झाड पडून वीजपुरवठा खंडित

बागायत ः माळगाव लाटकोंडवाडी येथे विद्युतभारीत तारांवर माडाचे झाड पडून सहा विद्युत खांब मोडल्याने माळगाव येथील वीजपुरवठा दोन दिवस खंडित आहे. शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. यात वीज वितरणचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच वीज वितरणचे कर्मचारी स्वप्निल धामापूरकर यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन वीजपुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली. विरण उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता सरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts: