सिडनीहून शांघायला जाणाऱया विमानाच्या इंजिनाला छिद्र

सिडनी
चायना ईस्टर्न एअरलाइन्सचे एक विमान रविवारी रात्री मोठय़ा दुर्घटनेपासून सुदैवाने बचावले आहे. सिडनीहून शांघायसाठी उड्डाण भरल्यानंतर वैमानिकाला इंजिनाजवळ मोठे छिद्र पडल्याचे त्याला आढळले. परंतु संकटाची जाणीव होईपर्यंत विमानाने जवळपास 70 किलोमीटर अंतर कापले हेते. तसेच त्यावेळी विमान 5000 फूटाच्या उंचीवर होते. यानंतर विमान पुन्हा सिडनीच्या दिशेने वळवून आपत्कालीन लँडिंग करविण्यात आले. या विमानात 279 प्रवासी होते. या विमानाने रविवारी रात्री 10.30 वाजता सिडनीहून शांघायसाठी उड्डाण भरले होते. विमानाच्या चालक दलाला इंजिनाजवळ पडलेल्या भगदाडाबाबत कळले. विमानाच्या इंजिनाला पडलेले छिद्र उड्डाण भरल्यानंतर हवेत निर्माण झाले होते. वैमानिकाने याचा आवाज ऐकला आणि त्वरित सिडनी विमानतळावर परतण्याचा निर्णय घेतल्याचे एअरलाइन्सचे व्यवस्थापक कॅथी झांग यांनी सांगितले.
जळण्याचा वास येत होता
उड्डाणानंतर थोडय़ाच वेळात आम्हाला विमानात जळाल्याचा वास येत होता, आम्ही याची तक्रारही केली होती. आधी लहान आवाज येत होता, नंतर आवाजाची तीव्रता वाढली, ही घटना अत्यंत भयभीत करणारी होती असे एका प्रवाशाने सांगितले. विमान लँड झाल्यानंतर पाहिले असता इंजिनाची अवस्था अत्यंत खराब होती असे कार्ला नावाच्या एका प्रवाशाने म्हटले.