|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 11 पाकिस्तानी कैद्यांची भारताने केली सुटका

11 पाकिस्तानी कैद्यांची भारताने केली सुटका 

नवी दिल्ली

 भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांना पायदळी तुडवत फाशीची शिक्षा सुनावली असली तरी भारताने पुन्हा एकदा शेजारी देशाकरता मनाचा मोठेपणा दाखवत त्याचे नागरिक असलेल्या 11 कैद्यांची सुटका केली आहे. सोमवारी या सर्व कैद्यांना वाघा सीमेद्वारे मायदेशी पाठविण्यात आले. अधिकाऱयांनी या निर्णयाला सदिच्छा कृती ठरविले. तर या सर्व कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने भारताने त्यांना सोडल्याचा दावा पाकने केला आहे. कुलभूषण यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकारने घेतलेला अशाप्रकारचा हा पहिला निर्णय आहे. अस्ताना येथे झालेल्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या अनौपचारिक भेटीनंतर कैद्यांच्या सुटकेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.  कैद्यांची सुटका मानवतेचा मुद्दा असून याला जाधव यांच्या प्रकरणी पाकबाबत भारताच्या भूमिकेत बदल म्हणून पाहिले जाऊ नये असे भारतीय अधिकाऱयांनी सांगितले. पाक देखील भारतीय कैद्यांची सुटका करेल अशी अपेक्षा सरकारला वाटत आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या 132 भारतीय कैदी असून ज्यातील 57 जणांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे.